SPPU News: पुणे विद्यापीठात नोटांची उधळण! ३ लाखांना विकली पदवी; एनएसयुआय अन् युवासेना आक्रमक
SPPU News: प्रभारी कुलसचिव, परीक्षा संचालक आणि वित्त प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी; स्वतंत्र चौकशीची एनएसयुआयची आग्रही भूमिका.

SPPU News – पुणे विद्यापीठातील बीकॉमची बनावट पदवी सुमारे ३ लाखाला विकल्याच्या गंभीर प्रकरणाविरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय) तर्फे परीक्षा व मूल्यमापन मंडळ येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत भ्रष्टाचाराचा निषेध नोंदविला. आंदोलनकर्त्यांनी खोट्या नोटांची उधळण करून प्रतीकात्मक आंदोलन केले.
ही केवळ पदवी विक्री नसून विद्यापीठाच्या प्रतिष्ठेची विक्री असल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. या प्रकरणातील सर्व दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून प्रभारी कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, वित्त व लेखा विभागाच्या प्रमुखांचा राजीनामा घेऊन स्वतंत्र चौकशी करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या.
या वेळी एनएसयुआयचे पुणे जिल्हाध्यक्ष अभिजीत गोरे, उपाध्यक्ष सिद्धांत जांभुळकर, महासचिव विकास अवचार, संदीप गायकवाड, आदित्य भिसे, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.
दोषींवर कारवाई करा – युवासेना
बनावट पदवी प्रमाणपत्रे तयार देण्याचा प्रकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा आणि विद्यापीठाच्या प्रतिमेलाही धक्का देणारा आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे केली. या वेळी शिष्टमंडळात युवासेनेचे राम थरकुडे परेश खांडके ,सागर दळवी, सोहम जाधव ,स्तवन कांचन आदी सहभागी झाले होते.




