Pune District : राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देणार

इंदापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर क्रीडा, युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक, औकाफ या विभागाचा राज्याचा मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. या सर्व विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
मुंबई येथील मंत्रालयातील दालनात मंगळवारी (दि. 7) राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रीपदाचा पदभार स्विकारला. यावेळी क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे यांसह अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री भरणे म्हणाले, राज्यातील सर्वच खेळात खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अल्पसंख्याक घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी आग्रही असेल.
यावेळी जलतरण क्रीडा प्रकारात योगदान देणारे पद्मश्री मुरलीधर पेटकर यांना केंद्र शासनाच्यावतीने अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना सन्मानित केले. त्याचबरोबर क्रीडा मार्गदर्शक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, गोळाफेक क्रीडा प्रकारात सचिन खिल्लारी यांना अर्जुन पुरस्कार, शुटींग क्रीडा प्रकारात स्वप्निल कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सन्मान केला.





