धानोरीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 252 जणांचा सहभाग

पुणे – करोनाच्या संकटाच्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन धानोरी येथील जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 252 जणांनी रक्तदान केले. हा रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने धानोरी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी खासदार वंदना चव्हाण, वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष ऍड. नानासाहेब नलावडे, धानोरीगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील टिंगरे, जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शशिअण्णा टिंगरे आदींसह इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रग्ण संख्या वाढल्याने रक्ताची टंचाई भासू लागली आहे. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. त्या दृष्टीने शशिअण्णा टिंगरे यांनी रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. याबरोबरच त्यांनी इतरही अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याला प्राधान्य दिले आहे, असे म्हणत खासदार वंदना चव्हाण यांनी शशिअण्णा टिंगरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपण करण्याचा संकल्पही करण्याची आवश्यकता असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले आहे.
जहांगीर रुग्णालय रक्त पेढी व रेड प्लस रक्त पेढी यांच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. शिबिरातील रक्ताच्या बाटल्या त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आलेल्या आहेत. रक्तदात्यास बॅग, वॉफ यंत्र. तुळशीचे रोपटे अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. उत्साही वातावरणात हे शिबिर संपन्न झाले.





