प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहरात मोठ्या संख्येने कोकणवासी वास्तव्यास आहेत. होळी आणि गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळानच्या वतीने विशेष बस चालविण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड (वल्लभनगर) आगारातून १५० विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार यात वाढही केली जाऊ शकते. प्रामुखय्ाने या बसेस चिपळूण, दापोली, देवरूख, गुहागर, खेड, रत्नागिरी आणि सावंतवाडी या ठिकाणी जातील. एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली असून काही गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. विशेषतः २४ ते २७ ऑगस्टदरम्यान जाणाऱ्या प्रवाशांनी संख्या अधिक आहे. ग्रुप बुकिंगचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे कुटुंब आणि नातेवाइकांना एकत्र प्रवास करता येणार असून, घराजवळून इच्छित स्थळापर्यंत विशेष बस मिळेल. कोकणात गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. कोकणवासी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. नोकरी आणि कामानिमित्त इतर शहरांत वास्तव्यास असलेले कोकणवासीय या सणाला गावी जातात. त्यांच्या सोयीसाठी दरवर्षी एसटी महामंडळ राज्यभरातून विशेष बसेस सोडते. प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. आगाऊ बुकिंगवर १५ टक्के सवलत मिळणार असून, ६५ ते ७५ वर्षांदरम्यानच्या पुरुष प्रवाशांना व महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे. मागील वर्षी ८२ एसटी बसेस कोकणसाठी सोडण्यात आल्या होत्या आणि तीन हजार ४०० प्रवाशांनी प्रवास केला होता. तसेच तीन दिवसांत साडेसात लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यंदाही प्रतिसाद चांगला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.