PMP Bus: औद्योगिक कामगारांसाठी पीएमपीच्या विशेष बसगाड्या; तीन शिफ्टनुसार नियोजन
PMP Bus: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा सुरू

पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या प्रवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने विशेष बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
कंपन्यांच्या कामाच्या वेळा लक्षात घेऊन तीन शिफ्टनुसार विशेष बसगाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
औद्योगिक वसाहतींमधील बहुतांश कंपन्यांचे कामकाज सकाळी ६, दुपारी ३ आणि रात्री १० अशा तीन शिफ्टमध्ये चालते. या वेळांमध्ये कामगारांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, अनेक ठिकाणी कामगारांना खासगी वाहने किंवा कंपनीच्या स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने विशेष बससेवेचा आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, या तिन्ही वेळांमध्ये शहरातील अनेक नियमित मार्गांवर प्रवाशांची गर्दी तुलनेने कमी असते. त्यामुळे काही बसगाड्या आगारात किंवा थांब्यांवर उभ्या असतात. या रिकाम्या बसगाड्यांचा योग्य वापर करून औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची ने-आण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे नव्याने मोठ्या प्रमाणावर बसगाड्या उपलब्ध करण्याची गरजही कमी होऊ शकते.
या उपक्रमासाठी पीएमपी प्रशासनाकडून चाकण औद्योगिक वसाहतीसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. संबंधित कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांच्या कामाच्या शिफ्ट आणि ते राहत असलेल्या परिसराची माहिती घेऊन बसमार्ग निश्चित केले जाणार आहेत.
या विशेष बससेवेमुळे कामगारांना किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळण्यास मदत होईल. तसेच, सध्या कमी वापरात असलेल्या बसगाड्यांचा अधिक प्रभावी वापर होऊन पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि बससेवेचे मार्ग निश्चित झाल्यानंतरच कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.





