Pune : आळंदी आणि देहूसाठी पीएमपीच्या जादा बस

पुणे : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र देहू येथे येतात. या वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) आळंदी आणि देहूसाठी पुणे शहरातील महत्त्वाच्या बसडेपोतून जादा बस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
दि. १८ जून रोजी क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराज तर दि. १९ जून रोजी क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे. त्यामुळे भाविकांकडून दोन दिवस अधीपासून देहू आणि आळंदीत दाखल होतात. त्यामुळे भाविकांना पीएमपीची तत्काळ बससेबा उपलब्ध व्हावी यासाठी दि. १६ ते २० जूनदरम्यान जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, २१ आणि २२ जून रोजी पालखी मार्गावरील बसच्या संचलनात बदल होईल. ठराविक डेपोतून बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दि. १६ ते २० जूनदरम्यान आळंदी आणि देहूसाठी उपलब्ध बससेवा
* क्षेत्र आळंदीसाठी बससेवा
– स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरीरोड येथून सुटेल
– नियमीत संचलनातील आणि जादा असे एकूण १४६ बस दररोज धावणार
– दि. १९ जून रात्री १२ पर्यंत आळंदीसाठी बसव्यवस्था असेल.
– दि. २० रोजी पहाटे तीनपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. येथून आळंदीसाठी १६ जादा बस
* क्षेत्र देहूसाठी बससेवा
– पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी येथून बस सुटतील.
– नियमित संचलनातील आणि जादा असे एकूण १४६ बस दररोज धावणार
– देहू ते आळंदी मार्गावर एकूण २३ बसेस सेवा उपलब्ध आहे.
– या व्यतिरिक्त पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ११३ बसेस आळंदीसाठी भोसरी आणि विश्रांतवाडीपर्यंत धावणार
– जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान ४० आवश्यक) देण्यात येईल.





