पुणे : पीएमपीच्या ताफ्यात बस संख्या कमी आणि उत्पन्नातही घट झाली. अशातच फुकट्या प्रवाशांनी पीएमपीची डोकेदुखी वाढवली आहे. दररोज शहरात जवळपास ६० ते ७० फुकटे प्रवाशी सापडतात. तर न सापडणाऱ्या प्रवाशांची संख्या याहून अधिक आहे. त्यामुळे या फुकट्या प्रवाशांवर तपासणी पथकाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. मागील वर्षभरात १८ हजार १७० फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून ९१ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासांना सेवा दिली जाते. दररोज सरासरी १० लाख नागरिक बसमधून प्रवास करतात. त्यातून पीएमपीला दररोज दीड ते दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, या प्रवासात दररोज विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून पुणे, पिंपरी- चिंचवड आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील बस संचालनाच्या सर्व मार्गांवर तिकीट तपासणी पथके तैनात केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून बस स्टॉप, तसेच संचलनामध्ये प्रवासादरम्यान तिकीट तपासणी केली जाते. त्यामध्ये दररोज पन्नास ते साठ फुकटे प्रवासी सापडत आहेत. मात्र, जे सापडले नाही, अशी संख्याही वेगळीच आहे. पाच ते दहा रुपये तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या विनातिकीट प्रवाशांकडून ५०० रुपये दंड आकारला जातो, तरीही प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून येत आहेत. त्यामुळे तिकीट तपासणी आणखी कडक करण्यात आली आहे. कटू कारवाई टाळा… पीएमपीचे तिकीट ५ रुपये ते शंभर रुपये; परंतु प्रवासी एवढे कमी रुपयाचे तिकीट न काढता फुकट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. दहा- वीस रुपये वाचविण्याच्या नादात तपासणी पथकाला सापडल्यावर तीनशे ते पाचशे रुपये दंड भरावा लागतो. दर महिन्याला पीएमपीला फुकट्या प्रवाशांच्या कारवाईतून जवळपास ८ ते ९ लाखांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा आणि कटू कारवाई टाळावी, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.