अमरावती – सोयाबीनच्या दरात दीड महिन्यांपासून सातत्याने घट होत आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे दर ४ हजार ४५० रुपये ते ४ हजार ५३६ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सोयाबीनचे दर वाढतील, या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नव्हती. मात्र, भाव वाढण्याऐवजी कमीच होत आहेत. यंदा पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात जिल्ह्यात घट झाली आहे. त्यातच सोयाबीनचे दरही सातत्याने घसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. सोयाबीन पाठोपाठ कपाशीच्या दरातही घट येत आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून कापसाच्या दरातही घटसुरू आहे. कापूस निघाला त्यावेळी बाजारात ७ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव होता. समोर भाव वाढतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र वाढण्याऐवजी झपाट्याने घसरले आहे. सध्या कापसाचे दर ६ हजार ६००ते ६ हजार ७२५ रुपये उत्तम दर्जाच्या कापसाला तर पावसामुळे भिजलेल्या कापसाला तर ६ हजार २०० ते ६ हजार ३०० इतकाच भाव मिळतो आहे. पावसामुळे कपाशीच्या उत्पादनातही घट आली तसेच अनेक भागात बोंडअळीचा प्रकोपही झाला होता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अवघ्यादोन वेच्यानंतर उलंगवाडी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी यंदाउत्पादनात घट व भाव कमी झाल्यामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. तुरीला ८ हजार ते ९ हजार ५११ रुपये भाव कपाशी आणि सोयाबीन प्रमाणेच जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनातही यंदा मोठी घट आली आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार ५११ रुपये भाव बाजारात मिळत आहे. सध्या तुरीची आवकही कमी आहे.