Shirur Crop Damage : “साहेब, सांगा आता जगायचं कसं?” शिरूरमध्ये गारपिटीने डाळिंब बागा उद्ध्वस्त; शेतकऱ्याचा टाहो
Shirur Crop Damage : शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्याकडून गुनाटसह गारपीटग्रस्त गावांचा दौरा; नुकसान भरपाईसाठी शासनदरबारी पाठपुराव्याचे आश्वासन.

Shirur Crop Damage – शिरुर तालुक्याच्या पूर्व भागात बुधवार (दि.१) रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे न्हावरेसह, कोहकडेवाडी, निर्वी, चिंचणी, गुनाट, निमोणे, शिंदोडी या गावात कांदा, ऊस, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब तसेच चारापिके यांचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. गारपिटीचा सर्वात जास्त फटका गुनाट गावात बसला होता.
त्यामुळे शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके तसेच माजी आमदार अशोक पवार या दोघांनीही शुक्रवार (दि.3) गुनाट गावात बाधित शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. शुक्रवार (दि 3) रोजी सकाळी दहाच्या सुमारास गुनाट-न्हावरे रस्त्यावरील गुणवंतवाडी येथील शेतकरी सुभाष बन्सी झराड यांच्या डाळिंब बागेची पाहणी केली. झराड यांच्या डाळिंब बागेचे गारपिटीमुळे अतोनात नुकसान झाले.
हातातोंडाशी असलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला. अंदाजे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. दोन्ही आजी-माजी आमदारांनी सुभाष झराड यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आमदार माऊली कटके यांच्यासह पंचायत समिती सदस्य दीपक कोहकडे, उद्योजक बबन वाळके यांनी न्हावरे,
कोहकडेवाडी, निर्वी, गुनाट, निमोणे, शिंदोडी या ठिकाणी कार्यकर्त्यांसह भेटी देत नुकसानीची पाहणी केली. माजी आमदार अशोक पवार यांनीही गारपीट झालेल्या जवळपास सर्व गावात कार्यकर्त्यांसह भेट देत पाहणी केली. यावेळी गुनाट येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या निकषानुसार हेक्टरी मिळणारी मदत तुटपुंजी असल्यामुळे आम्हाला हेक्टरी मदतीची रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार या दोघांनीही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना मोबाइलद्वारे संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या मागणीवर आपण शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, अशी विनंती केली. यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, मंडल अधिकारी नंदकुमार खरात, तलाठी रुपेश शेटे, कृषी सहायक अंजुम मोमीन, शेतकरी उपस्थित होते.
साहेब सांगा आता जगायचं कसं?
गुनाट येथील गुणवंतवाडी येथील शेतकरी सुभाष झराड यांची पावणे दोन एकरांत डाळिंबाची 700 झाडे आहेत. लागवडीपासून पहिले पीक हातात येईपर्यंत त्यांनी बागेला 5 लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झराड यांची डाळिंबाची झाडे उन्मळून पडली. डाळिंबाला टिक पडली. त्यामुळे त्यांचे अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झराड दाम्पत्य हवालदिल झाले आहे. साहेब आता तुम्हीच सांगा जगायचं कस…? असा प्रश्न त्यांनी पंचनामा करायला आलेल्या अधिकाऱ्यांना विचारला.






