Alephata Market – जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील दुय्यम बाजार आवारात रविवारी (दि. १) कांद्याची विक्रमी आवक पाहायला मिळाली. पहाटेपासूनच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, पिकअप आणि मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या उपबाजारात रविवारी १० हजार ८६७ गोण्यांची आवक होत तब्बल ५४३३ क्विंटल कांदा दाखल झाला. विशेष म्हणजे, आवक मोठ्याप्रमाणात असूनही दरात स्थिरता राहिली. लिलाव प्रक्रियेदरम्यान व्यापाऱ्यांमध्ये चांगली चुरस दिसून आली. आळेफाटा उपबाजार समितीच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे ही लिलाव प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली. सध्या बाजारात नवा कांदा मोठ्या प्रमाणात येत असून, दर्जेदार मालाला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी मिळत आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय शिवाजीराव काळे, उपसभापती निवृत्ती मुरलीधर काळे आणि सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बाजाराचे कामकाज सुरू आहे. आगामी लिलावातही दर टिकून राहतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. आळेफाटा उपबाजार आवारात लिलावाचे दिवस मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असे निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी १० वाजता लिलावास सुरुवात होते आणि जोपर्यंत सर्व वाहनांचे व्यवहार पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी मोठी सोय झाली असून, व्यवहारात पारदर्शकता जपली जात आहे. १० किलोचे बाजारभाव खालीलप्रमाणे राहिले नव्या सुपर मोठ्या साईजचा १ नंबर गोळा १२० ते १३१ रुपये, सुपर कांदा ११० ते १२० रुपये, सुपर मीडियम ९० ते ११० रुपये, गोल्टी व गोल्टा ७० ते ९० रुपये आणि बदला व चिंगळी कांद्याला ३० ते ६० रुपये दर मिळाला. मोठ्या साईजच्या नव्या कांद्याला १३१ रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला. वाढती आवक असूनही दर स्थिर गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकरी संभ्रमात होते; मात्र आजच्या लिलावाने बाजारात सकारात्मक संकेत दिले आहेत. वाढती आवक असूनही दर कोसळले नाहीत, ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल प्रतवारी करून आणल्यामुळेच त्यांना अपेक्षित आणि चांगले दर मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले आहे.