South Zone Rejects BCCI’s Directive : भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा संपल्यानंतर सर्व खेळाडू विश्रांतीवर गेले असून, संघ आता थेट आशिया कपमध्येच मैदानात उतरेल. मात्र, त्याआधी 28 ऑगस्टपासून भारतात घरगुती क्रिकेट हंगामाला सुरुवात होत आहे. यंदाच्या दलीप ट्रॉफी स्पर्धेपासून या हंगामाचा प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत सहा वेगवेगळ्या झोनच्या संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी साउथ झोनने बीसीसीआयच्या सूचनांना नकार दिला आहे. साउथ झोनने बीसीसीआयच्या सूचनांना नकार – मात्र, साउथ झोनने बीसीसीआयच्या सूचनांना नकार देत केएल राहुल, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, प्रसिध कृष्णा आणि साई सुदर्शन यांसारख्या कसोटी संघातील प्रमुख खेळाडूंना संघात स्थान न देण्याचा निर्णय घेतला आहे. दुलीप ट्रॉफीच्या संघांमध्ये नॉर्थ झोनने शुबमन गिलला कर्णधारपद दिले होते, तर ईस्ट झोनने ईशान किशनला ही जबाबदारी सोपवली होती. मात्र, फिटनेसमुळे हे दोन्ही खेळाडू आता स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. बीसीसीआयने काही आठवड्यांपूर्वी सर्व झोनांना दिल्या होत्या सूचना – दुसरीकडे, वेस्ट झोनने शार्दुल ठाकुरवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. हे सर्व खेळाडू बीसीसीआयच्या केंद्रीय कराराचा भाग आहेत. साउथ झोनने मात्र कसोटी संघातील आणि केंद्रीय करारातील खेळाडूंना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केवळ तिलक वर्मा याला संघात स्थान मिळाले असून, तो साउथ झोनचा कर्णधारही असेल. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने काही आठवड्यांपूर्वी सर्व झोनांना पत्र पाठवून केंद्रीय करारातील आणि विशेषतः कसोटी संघातील खेळाडूंना दुलीप ट्रॉफीच्या संघात समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. इतर झोननी या सूचना मान्य केल्या, परंतु साउथ झोनने याला स्पष्ट नकार दिला. हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहली पुनरागमनासाठी सज्ज! लंडनमध्ये सराव करतानाचे फोटो व्हायरल साउथ झोनच्या अधिकाऱ्यांचे काय आहे म्हणणे? साउथ झोनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, दुलीप ट्रॉफी ही केवळ रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी असावी. कसोटी संघातील खेळाडूंना इंडिया ‘अ’ संघासाठी खेळण्याची संधी कधीही मिळू शकते. तसेच, राष्ट्रीय निवड समितीचा झोनल निवडीत हस्तक्षेप असू नये किंवा बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी रणजी ट्रॉफी खेळणे अनिवार्य करावे, असेही त्यांनी सुचवले. हेही वाचा – पीयूष चावलासह १३ भारतीय खेळाडूंनी SA20 Auction साठी केली नाव नोंदणी, पाहा संपूर्ण यादी साउथ झोनच्या एका अधिकाऱ्याने केरळ क्रिकेट संघाचे उदाहरण दिले. केरळने प्रथमच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अशा कामगिरीनंतर केरळच्या खेळाडूंना झोनच्या संघात स्थान मिळायला हवे, परंतु कसोटी खेळाडूंच्या समावेशामुळे त्यांना संधी मिळणे कठीण होते, असे त्यांनी नमूद केले. दुलीप ट्रॉफीच्या या निर्णयामुळे घरगुती क्रिकेट हंगामाची सुरुवात चर्चेचा विषय ठरली आहे. आता सर्वांचे लक्ष या स्पर्धेतील नव्या चेहऱ्यांच्या कामगिरीकडे असेल.