पीयूष चावलासह १३ भारतीय खेळाडूंनी SA20 Auction साठी केली नाव नोंदणी, पाहा संपूर्ण यादी

13 Indian Players Register for SA20 Auction : दक्षिण आफ्रिका 20 (SA20) लीगच्या चौथ्या हंगामासाठी 9 सप्टेंबर 2025 रोजी जोहान्सबर्ग येथे लिलाव होणार आहे. यंदाच्या लिलावासाठी 784 खेळाडूंनी नोंदणी केली असून, त्यात 13 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व भारतीय खेळाडू निवृत्त झालेले किंवा आयपीएलमधून बाहेर पडलेले आहेत. क्रिकबझच्या अहवालानुसार, यामध्ये पीयूष चावला, सिद्धार्थ कौल आणि अंकित राजपूत यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
फक्त 84 खेळाडूंवर लागणार बोली –
या लिलावात एकूण 84 खेळाडूंसाठी जागा उपलब्ध असतील. सर्व भारतीय खेळाडूंची किमान किंमत (बेस प्राइस) 2 लाख रँड ठेवण्यात आली आहे, परंतु पीयूष चावलाची बेस प्राइस 10 लाख रँड आहे. सहा फ्रँचायझी संघ या लिलावात सहभागी होणार असून, त्यांच्याकडे एकूण 74 दशलक्ष डॉलरचे बजेट असेल.
वाइल्डकार्ड खेळाडूची नवीन संकल्पना –
SA20 लीगने यंदा एक नवा नियम आणला आहे, ज्यामुळे प्रत्येक संघाला एक वाइल्डकार्ड खेळाडू निवडण्याची संधी मिळेल. हा खेळाडू दक्षिण आफ्रिकन किंवा परदेशी कोणताही असू शकतो. विशेष म्हणजे, या खेळाडूचा पगार संघाच्या पगार मर्यादेत (सॅलरी कॅप) मोजला जाणार नाही.
हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहली पुनरागमनासाठी सज्ज! लंडनमध्ये सराव करतानाचे फोटो व्हायरल
दिनेश कार्तिक ठरला पहिला भारतीय खेळाडू –
माजी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक हे SA20 लीगमध्ये खेळणारा पहिले भारतीय क्रिकेटपटू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यानी तिसऱ्या हंगामात पार्ल रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले. यंदा लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये पीयूष चावला (यूपीसीए), सिद्धार्थ कौल (पंजाब), अंकित राजपूत (यूपीसीए) निखिल जगा (राजस्थान), मोहम्मद फैद, केएस नवीन (तामिळनाडू), अन्सारी मारूफ, महेश अहिर (गुजरात) सारुल कंवर (पंजाब), अनुरीत सिंह कथुरिया (दिल्ली), इम्रान खान (यूपीसीए) वेंकटेश गैलीपेल्ली आणि अतुल यादव (यूपीसीए) इत्यांदीच्या नावांचा समावेश आहे.
26 डिसेंबर 2025 पासून होणार सुरुवात –
SA20 लीगचा चौथा हंगाम 26 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून अंतिम सामना 25 जानेवारी 2026 रोजी खेळवला जाईल. या लीगमधील सर्व सहा फ्रँचायझींचे मालक भारतीय असल्याने, गेल्या तीन हंगामांमध्ये एकाही पाकिस्तानी खेळाडूला संघात स्थान मिळालेले नाही. पण यंदाच्या हंगामासाठी ४० खेळाडूंनी नोंदणी केली आहे. तसेच या लीगमधील फ्रँचायझींची नावे एमआय केपटाऊन, जोहान्सबर्ग सुपर किंग्ज, डरबन सुपर जायंट्स, सनरायझर्स ईस्टर्न केप, पार्ल रॉयल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स अशी आहेत.





