नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता नव्या मैदानातील खेळीसाठी सज्ज झाला आहे. तो पश्चिम बंगालमध्ये पोलादाचा कारखाना सुरू करणार आहे. त्यामुळे आजवर क्रिकेट आयकॉन म्हणून ओळखला जाणारा गांगुली यापुढे उद्योगपतीही बनलेला दिसेल.
गांगुलीच्या आजोबांनी 50-55 वर्षांपूर्वी पोलादाचा व्यवसाय सुरू केला. आता त्या कुटूंबाच्या व्यवसायात लक्ष घालून तो वाढवण्यासाठी गांगुली सरसावला आहे. तो बंगालच्या पश्चिम मेदिनीपूरमध्ये पोलाद कारखान्याची उभारणी करणार आहे. गांगुली कुटूंबाचा तो तिसरा कारखाना असेल. स्वत: गांगुली यानेच त्याविषयीची माहिती स्पेनमधील बंगाल ग्लोबल बिझिनेस समिटमध्ये दिली.
यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. ममता सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. बंगालमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशातून त्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.गांगुलीच्या या नव्या इनिंगकडे अनेक चाहत्यांचे देखील लक्ष लागले आहे.
ममतांच्या नेतृत्वाखाली परदेश दौऱ्यावर असणाऱ्या शिष्टमंडळात काही उद्योगपती आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. त्या शिष्टमंडळात गांगुलीचाही समावेश आहे. त्याच्या पोलाद कारखान्याच्या उभारणीचे काम पाच ते सहा महिन्यांत सुरू होईल. त्यानंतर वर्षभरात कारखान्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.