Sourav Ganguly Clarification : युसूफ पठाणचा राजीनामा अन् ममता बॅनर्जींचा ‘तो’ प्लॅन; बंगालच्या राजकीय केंद्रात अचानक कसं आलं गांगुलीचं नाव?
Sourav Ganguly Clarification : सौरव गांगुलीने ममता बॅनर्जी यांचा एक गुप्त राजकीय मेसेज माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण पर्यंत पोहोचवल्याचा दावा केला जात होता. आता स्वतः गांगुलीने समोर येत या सर्व चर्चांवर आपले मौन सोडले आहे.

Sourav Ganguly Clarification on Passing Mamata Banerjee Message : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याची चर्चा असतानाच, आता बंगालच्या राजकीय वर्तुळात एक खळबळजनक वृत्त समोर आले होते. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने ममता बॅनर्जी यांचा एक गुप्त राजकीय मेसेज माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण पर्यंत पोहोचवल्याचा दावा केला जात होता. आता स्वतः सौरव गांगुलीने समोर येत या सर्व चर्चांवर आपले मौन सोडले आहे.
बहरामपूर मतदारसंघावरून राजकीय डावपेच?
बंगालच्या राजकारणात सध्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघाविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना संसदेत (लोकसभेत) पाठवण्यासाठी तृणमूलकडून मोठा डाव आखला जात असल्याचे बोलले जात आहे. यासाठी बहरामपूरचे विद्यमान खासदार युसूफ पठाण यांना खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले असून, हा निरोप ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीमार्फत पाठवल्याची चर्चा होती. युसूफ पठाण यांनी राजीनामा दिल्यास त्या जागेवरून पोटनिवडणूक लढवून ममता बॅनर्जी संसदेत जाण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत होती.
“माझा राजकारणाशी संबंध नाही!”
Former Captain of the Indian Cricket Team, Sourav Ganguly, says, “…It was alleged that I had contacted Mr Yusuf Pathan on behalf of Mamta Banerjee, the former Chief Minister of West Bengal and had carried her message that he should step down/resign from his Constitutional post… pic.twitter.com/0RkRsRhYfo
— ANI (@ANI) June 6, 2026
या सर्व वादावर स्पष्टीकरण देताना सौरव गांगुली म्हणाला, “माझे युसूफ पठाणसोबत या विषयावर कोणतेही बोलणे झालेले नाही. ममता बॅनर्जी यांनी मला असा कोणताही राजकीय संदेश युसूफपर्यंत पोहोचवण्यास सांगितला नव्हता. मी कोणत्याही राजकीय घडामोडींचा भाग नाही.”
गांगुलीने माध्यमांना सुनावलं –
गांगुलीने पुढे माध्यमांवर संताप व्यक्त करत म्हटले की, मीडियाने अत्यंत जबाबदारीने वृत्तांकन केले पाहिजे. अशा गंभीर आणि संवेदनशील बातम्या देण्यापूर्वी त्याची पूर्ण खात्री करणे गरजेचे आहे. माझ्यावर आणि या प्रकरणावर जोडले जात असलेले सर्व दावे पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. गांगुलीच्या या स्पष्टीकरणानंतर सध्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला, तरी बंगालमधील राजकीय तापमान वाढलेलेच आहे.




