पुणे जिल्हा | ज्वारीचा पेरा खरिपाचा बॅकलॉग भरेल!

वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्हे व परिसरात पावसाळा संपत आला तरीदेखील मोठा पाऊस अद्यापपर्यंत पडला नसल्याने परिसरातील नैसर्गिक ओढे, नाले, बंधारे, तलाव अद्यापपर्यंत भरले नाहीत.
मागील वर्षांपासून या परिसरात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने, कमी पावसामुळे बळीराजा मेटाकुटीस आला असला तरी रब्बी हंगामात अता जर पावसाने हजेरी लावलेली तर ज्वारीचा पेरा खरिपाचा पेरा बॅकलॉग भरून काढेल अशी बळीराजाला आशा आहे.
मागील वर्षांपासून वाल्हे व परिसरात पाऊस कमी झाल्याने, शेतकरीवर्गापुढे कमी पाण्याचे पीक घेण्याचे संकट ओढावत आहे. तसेच, वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम शेतीवर आणि पर्यायाने पिकांवर होत आहे.
मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामान होत असून, मागील काही दिवसांपासून, पहाटे थंडीची चाहूल व दिवसभर ऊन्हाचा चटका वाढला असून अशा वातावरणामुळे पिकांवर रोगराईचे प्रमाणात वाढत आहे.
तसेच या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक जलस्त्रोत लवकरच संपुष्टात येण्याची भीती शेतकरीवर्गामधून व्यक्त होत आहे.
वाल्हे व परिसरात मागील वर्षापासून पाऊस खूप कमी झालेला आहे. या कारणामुळे परिसरातील शेतकरीवर्गाने पिकांच्या पाण्याचे नियोजन करून यावर्षी, ज्वारीच्या पेरणीस लवकरच सुरूवात केली आहे.
शेतकर्यांनी धान्यांची अपेक्षा न करता जनावरांना चार्यासाठी बाटूक किंवा कडबा तरी मिळावा या अपेक्षेने ज्वारीची पेरणी शेतकरीवर्ग करीत आहेत.
कदाचित पुढील काही दिवसांत मोठा पाऊस पडलाच तर, किमान जनावरांना चा-यापुरते तरी ज्वारीचे बाटूक उपयोगी पडेल, अशी आशा शेतकरीवर्गाला लागली आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊसाच्या हजेरीने, ज्वारी पीक काही ठिकाणी चांगले आले होते. यामुळेच पुढील काही दिवसांत पाऊस पडला तर यावर्षीही ज्वारी पीक पदरात पडेल, अशी आशा शेतकरीवर्ग व्यक्त करीत आहेत.
2020-21 मधील स्थिती
2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकर्यांनी रब्बी हंगामावर अधिकसा भर दिला होता. त्यावेळी,ज्वारी पिकांचे क्षेत्र सरासरी 1239 हेक्टर पर्यंत होते.
यानंतर,2021 मध्ये, ज्वारीचे क्षेत्र कमी 1037 हेक्टरवर पेरा झाला होता. त्यावेळी, अतिवृष्टीमुळे ज्वारीचा पेरा कमी झाला होता. त्यावर्षी, जरी ज्वारीचे क्षेत्र कमी झाले असले तरी पाऊस चांगला झाल्याने कांदा, हरभरा, गहू, फळबाग आदी पिकांचे क्षेत्र वाढले होते.
तसेच परतीच्या पावसाने खरिपाचे होत्याच नव्हते करून टाकले होते. शेतकरी कसाबसा या अस्मानी सकंटातून सावरत काही प्रमाणात रब्बीची पेरणी तसेच ऊस लागवडीकडे शेतकरीवर्ग जास्त प्रमाणात वळलेला होता.
2022-23मधील परिस्थिती
2022 मध्ये पावसाचे प्रमाण सप्टेंबर अखेरपर्यंत वाल्हे व परिसरात कमी झाल्याने, त्यावर्षी ज्वारीचा पेरा, जिरायत ज्वारी व बागायत ज्वारी मिळून, एकूण पेरणी क्षेत्र जवळपास 1113 हेक्टर पेरणी झालेली होती.
2023 मध्ये अतिअल्प पर्जन्यमानाचा फटका सर्वच पिकांना बसला होता. त्यामुळे मागील वर्षी ज्वारीचा पेरा घटून सरासरी 975 हेक्टर क्षेत्रात ज्वारीचा पेरा झाला होता.
यंदा 149 हेक्टरने पेरा घटला
चालू वर्षी 22 ऑक्टोबर अखेर वाल्हे व परिसरात बागायती भागात सरासरी फक्त 76 हेक्टर क्षेत्रात ज्वारी पेरा झाला असून जिरायती भागात सरासरी 750 हेक्टर क्षेत्रावर 22 ऑक्टोबर अखेर ज्वारी पेरा झाला असून बागायती व जिरायती भागातील सरासरी एकूण फक्त 826 हेक्टर क्षेत्रात ज्वारी पेरा झाला आहे.
दरम्यान मागील वर्षीपेक्षा, 22 ऑक्टोबर अखेर, सरासरी ज्वारीचा पेरा 149 हेक्टर घटला असल्याची माहिती कृषी सहाय्यक गीता पवार, मयुरी नेवसे यांनी दिली.





