पुण्यात पुन्हा कोसळधारा! दुपारी 1 ते 4 मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून महाराष्ट्राला यॅलो अर्लट जारी

Pune Rain : पुण्यात अवकाळी पावसाला सुरूवात झाली असून शहरातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. शहरात सकाळपासूनच वातावरण ढगाळ झाले होते. हवामान विभागाने तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
आज १३ मे २०२५ रोजी, पुण्यातील कोथरूड, सिंहगड रस्ता आणि वारजे परिसरात सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात घट झाली असून, उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये १६ मेपर्यंत हलका पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे दैनंदिन तापमान ३२°C ते ३४°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे, जे सरासरीपेक्षा सुमारे ४°C ने कमी आहे.
हवामानातील बदलाचे कारण:
मध्य प्रदेशवरील उच्चस्तरीय वायुवेग आणि पूर्व मध्य अरबी समुद्र ते उत्तर छत्तीसगडपर्यंत पसरलेल्या द्रोणीय रेषेमुळे या हवामानात बदल झाला आहे.
नागरिकांसाठी सूचना:
पावसामुळे काही भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहनचालकांनी काळजी घ्यावी.
घराच्या आसपास पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी, कारण त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ शकते.
पुणे महानगरपालिकेने डास नियंत्रणासाठी फॉगिंग आणि कचरा व्यवस्थापनाची कामे सुरू केली आहेत.
मान्सून आगमनाची शक्यता:
या वर्षी मान्सून नेहमीपेक्षा लवकर, म्हणजेच २७ मेच्या सुमारास केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे तापमानात घट झाली असली, तरी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
अनेक भागांत साचले पाणी
शहराच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने शहरातील रस्त्यावर पाणी साचले आहे. शहरातील कोथरुड, बावधन, वारजे, कात्रज, सिंहगड रस्ता, धायरी, धनकवडी, पाषाण, औंध, वडगांव शेरी, येरवडा, विश्रांतवाडी, खराडी, हडपसर यासह शहराच्या मध्यवर्ती भागात जोरदार सरीने पुणेकरांची धांदल उडवली. जिल्ह्यातही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.



