Pune District : ढगाळ वातावरणामुळे औषध फवारणीच्या खर्चात वाढ

लोणी देवकर : इंदापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकर्यांच्या औषध फवारणीवरील खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
सध्या उन्हाळी हंगाम चालू असूनही दिवसा कडक उन व ढगाळ वातावरण आणि रात्री थंडी अशा विषम हवामानामुळे पिकांवर बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. भाजीपाला पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याची माहिती प्रगतशील शेतकर्यांनी दिली.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये कृषी सेवा केंद्रांमधील कीटकनाशक व बुरशीनाशक औषधांच्या विक्रीत वाढ झाली आहे. तसेच सध्याच्या ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकांवर किडी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने राहिल्याने वारंवार औषध फवारणी करावी लागत असल्याने शेतकर्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात काळजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.





