Sonu Sood : सोनू सूद पुन्हा एकदा मदतीस धावले: ५०० वृद्धांसाठी घर तर शेतकऱ्यांवर चित्रपट

Sonu Sood: अभिनेता आणि समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यंदाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी ५०० वृद्धांसाठी एक भव्य वृद्धाश्रम उभारण्याची घोषणा केली असून, याशिवाय ते शेतकरी, कामगार आणि वृद्धांच्या संघर्षावर आधारित चित्रपटही तयार करत आहेत.
वाढदिवसाला मिळालं देशभरातून प्रेम
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद यांनी सांगितले की, “देशभरातून लोकांनी वाढदिवसानिमित्त प्रेम आणि शुभेच्छा दिल्या. कोणीतरी माझ्या नावाने पूजा केली, तर काहींनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या. हे पाहून खूप छान वाटलं.”
५०० वृद्धांसाठी नव्या घराचा आधार
सोनू सूद पुढे म्हणाले, “मी नेहमीच विचार करतो की, ज्या वृद्धांनी आयुष्यभर कुटुंब आणि समाजासाठी आयुष्य घालवलं, त्यांना शेवटच्या टप्प्यावर एकटं का ठेवलं जातं? म्हणूनच मी ५०० वृद्धांसाठी एक वृद्धाश्रम उभारण्याचं काम सुरू केलं आहे. हे केवळ राहण्याचं ठिकाण नसेल, तर त्यांना आपलेपणा, काळजी, उपचार, संवाद आणि आनंद मिळेल. माझं स्वप्न आहे की पुढचा वाढदिवस मी त्यांच्यासोबत तिथे साजरा करावा.”
वृद्ध जोडप्याला पाठवली गाय
एका वृद्ध दाम्पत्याच्या मदतीबाबत सोनू म्हणाले, “जेव्हा कळलं की त्यांच्या उपजीविकेचा एकमेव आधार गाय आहे, तेव्हा तातडीने त्यांच्यासाठी गाय पाठवली. ही गोष्ट नियोजनात नव्हती, ती हृदयातून आली.”
शेतकऱ्यांवर बनवणार खास चित्रपट
सोनू सूद सध्या एका महत्वाकांक्षी प्रोजेक्टवर काम करत आहेत. ते म्हणाले, “मी शेतकऱ्यांवर चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात फक्त शेती नाही, तर त्यांच्या मेहनतीचा, संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा प्रवास दाखवला जाईल. मी स्वतः ही फिल्म डायरेक्ट करतोय. कारण मला हे कथानक खर्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे.”
अनोख्या अॅक्शन फिल्मचंही दिग्दर्शन
याशिवाय सोनू एक अॅक्शन फिल्मही तयार करत आहेत. त्यात वेगळ्या प्रकारचं अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. “भारतीय सिनेमात यापूर्वी असं अॅक्शन क्वचितच पाहायला मिळालं असेल. लवकरच मी याची घोषणा करणार आहे,” असंही ते म्हणाले.
सिनेमातून समाजाचे प्रश्न समोर आणण्याचा प्रयत्न
“आता सिनेमा केवळ मनोरंजनापुरता नको, तर समाजाच्या समस्या, दुःख आणि भावना मांडणारा असावा,” असं मत सोनू सूद यांनी व्यक्त केलं. “शेतकरी, कामगार, वृद्ध यांची कहाणी लोकांपर्यंत पोहोचवणं हीच माझी जबाबदारी आहे,” असं ते म्हणाले.





