Namrata Shirodkar: मिस इंडिया ते सुपरस्टार सून; नम्रता शिरोडकरांची फिल्मी जर्नी

Namrata Shirodkar: ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री नम्रता शिरोडकर आजही लोकांच्या लक्षात आहेत. अभिनयापासून दूर असूनही त्यांची जीवनयात्रा प्रेरणादायी ठरते. आज त्या आपला ५४वा वाढदिवस साजरा करत आहेत.
नम्रता शिरोडकर यांचा जन्म २२ जानेवारी १९७२ रोजी मुंबईत झाला. त्यांची आई वनिता शिरोडकर, तर मोठी बहीण शिल्पा शिरोडकर या ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. फार कमी लोकांना माहिती आहे की नम्रता यांनी अवघ्या ५व्या वर्षी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. पुढे त्यांनी मॉडेलिंगकडे करिअर वळवलं.Namrata Shirodkar
मिस इंडिया ते बॉलिवूड पदार्पण
१९९३ मध्ये नम्रता यांनी मिस इंडियाचा किताब जिंकून देशभरात ओळख मिळवली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. १९९८ मध्ये प्रदर्शित ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातून त्यांनी सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये नायिकेची भूमिका साकारत पदार्पण केलं. मात्र हा चित्रपट त्यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला नाही.Namrata Shirodkar

‘वास्तव’मुळे खरी ओळख
नम्रता यांना खरी ओळख मिळाली संजय दत्त यांच्या सुपरहिट ‘वास्तव’ चित्रपटातून. यात त्यांनी संजय दत्त यांच्या पत्नीची भूमिका केली होती. त्यांच्या सशक्त अभिनयाचं प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही कौतुक केलं. यानंतर त्यांनी कच्चे धागे, पुकार, हीरो हिंदुस्तानी, मसीहा, LOC कारगिल अशा चित्रपटांत काम केलं. तरीही बॉलिवूडमध्ये त्यांची कारकीर्द फार दीर्घकाळ टिकली नाही.Namrata Shirodkar
महेश बाबूंशी लग्न, कुटुंबाला प्राधान्य
२००० साली तेलुगू चित्रपट ‘वामसी’च्या सेटवर नम्रता यांची ओळख अभिनेता महेश बाबू यांच्याशी झाली. तिथून दोघांमध्ये प्रेम फुललं. सुमारे पाच वर्षांच्या डेटिंगनंतर २००५ मध्ये त्यांनी विवाह केला. लग्नानंतर नम्रता यांनी अभिनयातून निवृत्ती घेऊन कुटुंबाला पूर्णवेळ प्राधान्य दिलं.
आज नम्रता शिरोडकर या मुलगी सितारा आणि मुलगा गौतम यांच्या आई आहेत आणि महेश बाबूंसोबत आनंदी कौटुंबिक जीवन जगत आहेत. अभिनयापासून दूर असल्या तरी त्यांची कथा आजही अनेकांसाठी प्रेरणा ठरते.Namrata Shirodkar





