Pune : भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग २७ मधील सुमारे ३०० रिक्षाचालकांना नैसर्गिक ‘थंडगार पाणी पिशवी’चे वाटप करण्यात आले. लोकमान्य नगर येथील दत्त मंदिर चौकात हा उपक्रम उत्साहात पार पडला. रिक्षाचालक हे शहराच्या वाहतुकीतील महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद करत स्व. गिरीश बापट यांनी सुरू केलेल्या ‘ए रिक्षावाले नाही, तर ओ रिक्षावाला म्हणा’ या उपक्रमाची आठवण घाटे यांनी करून दिली. ‘उमेद चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी स्वच्छ पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत प्लास्टिक बाटल्यांऐवजी नैसर्गिक पाणी पिशवी अधिक उपयुक्त ठरेल, अशी भावना विजय गायकवाड यांनी व्यक्त केली. या वेळी मनिषा घाटे, आनंद पाटील, सुनील खंडाळे, राजेंद्र फाटे, प्रशांत सुर्वे, संजय गावडे, अंकुश नवले, सुनील शिंदे, राम बडंबे, सुनिता जंगम, अनिकेत खेडेकर, अतुल पाटील, कमलेश पाठक यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुधीर बजरंग म्हस्के यांनी केले.