Rajpal Yadav – चेक-बाउन्स प्रकरणात विनोदी कलाकार राजपाल यादव यांनी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर अभिनेता सोनू सूद मंगळवारी त्यांच्या मदतीसाठी पुढे आला. सूद यांनी यादवला भविष्यातील चित्रपटांमध्ये भूमिका देऊन कराराची रक्कम आगाऊ स्वरूपात देण्याची तयारी दर्शवली असून, इतर निर्माते व सहकाऱ्यांनाही मदतीचे आवाहन केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने थकीत रक्कम भरण्यासाठी अधिक वेळ देण्यास नकार दिल्यानंतर यादव यांना तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांना जवळपास ९ कोटी रुपयांची थकबाकी भरावी लागणार आहे. सन २०१० मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र चित्रपट अपयशी ठरला होता. आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता सोनू सूद म्हणाला की, राजपाल यादव हा अत्यंत प्रतिभावान अभिनेता आहे. कधी कधी आयुष्य अन्याय्य ठरते. हा वेळ आहे की आपण सर्वांनी एकत्र उभे राहावे. भविष्यातील कामाच्या बदल्यात देण्यात येणारी आगाऊ रक्कम दान नसून प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. या भूमिकेचे चाहत्यांनी कौतुक केले असून, सोशल मीडियावर सूदच्या पुढाकाराला मोठा पाठिंबा मिळत आहे.