आनंद शर्मा, मनिष तिवारींशी सोनियांचा संवाद; असंतुष्ट गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली – कॉंग्रेसमधील असंतुष्ट मानल्या जाणाऱ्या 23 नेत्यांच्या गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षाने सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी आनंद शर्मा आणि मनिष तिवारी या नेत्यांची भेट घेतली.
कॉंग्रेसमधील असंतुष्ट गट मागील काही काळापासून सातत्याने पक्षाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आहे. त्या गटाकडून व्यापक संघटनात्मक फेररचनेची मागणी केली जात आहे. अशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसची राजकीय घसरण सुरूच राहिली. त्या निवडणुकांच्या निकालांनंतर असंतुष्ट गटाच्या काही बैठका झाल्या.
त्यामुळे कॉंग्रेसमधील अस्वस्थता वाढीस लागल्याचे चित्र समोर आले. त्यापार्श्वभूमीवर, नाराजी दूर करण्यासाठी असंतुष्ट गटापर्यंत पोहचण्याच्या हालचाली कॉंग्रेस नेतृत्वाने सुरू केल्या. त्या गटातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक असणारे गुलाम नबी आझाद यांची काही दिवसांपूर्वी सोनियांनी भेट घेतली. त्यानंतर सोनियांनी शर्मा आणि तिवारी यांच्याशी चर्चा केली.
आगामी निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्यासाठी पक्षाला बळकट करण्याच्या उद्देशातून काही उपाययोजना शर्मा आणि तिवारी यांनी चर्चेवेळी सुचवल्याचे समजते. पुढील काही दिवसांत सोनिया असंतुष्ट गटातील आणखी काही नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती पक्षाच्या सुत्रांनी दिली.





