Priyanka Gandhi : जुने पाढे वाचण्यापेक्षा विकासाचे बोला; प्रियांका गांधी यांची भाजपवर टीका
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी १० वर्षे जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा आगामी ५ वर्षांच्या विकासाचा आराखडा मांडावा, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी जोरदार निशाणा साधला.

Priyanka Gandhi : मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी १० वर्षे जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा आगामी ५ वर्षांच्या विकासाचा आराखडा मांडावा, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी जोरदार निशाणा साधला. आसाममध्ये सध्या राजकीय वातावरण तापले असून, प्रियांका गांधी यांनी राज्यातील भ्रष्टाचार आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला धारेवर धरले.
सरमा यांनी अलीकडेच २०१४ मधील एका घटनेचा संदर्भ देत खळबळजनक दावा केला होता. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्याला मुख्यमंत्री करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे ते शक्य झाले नाही, असे सरमा म्हणाले होते.
या दाव्याचा समाचार घेताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, राजकारणात अनेक निर्णय घेतले जातात, कधी ते आपल्या बाजूने असतात तर कधी विरोधात. १० वर्षे जुन्या गोष्टींवर अजूनही रडत बसण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताचे बोलणे गरजेचे आहे. राज्यातील तरुणांना नोकऱ्यांची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे राज्याची संपत्ती केवळ काही मोजक्या उद्योगपतींच्या आणि एका कुटुंबाच्या घशात घातली जात आहे.
आसामची जमीन आणि येथील संसाधने ही जनतेची मालमत्ता आहे, ती कोणाची खाजगी मालमत्ता नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यातील वाढता भ्रष्टाचार हा इथल्या जनतेशी केलेला विश्वासघात असून, आसामची जनता आता बदलाच्या मूडमध्ये असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले. जनता आता सुज्ञ झाली आहे, त्यांना जुन्या वादात रस नसून विकासाचे ठोस पाऊल हवे आहे, असे सांगत त्यांनी युवा आणि महिला मतदारांना साद घालताना सकारात्मक राजकारणाची कास धरण्याचे आवाहन केले.






