Somnath Suryawanshi : फडणवीसांनी सभागृहात खोटं बोलून महाराष्ट्राला कलंक लावला; सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोश

Somnath Suryawanshi : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. शुक्रवारी (१८ जुलै) विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर वक्तव्य करताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ‘कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अक्युट कोरोनरी सिंड्रोम’मुळे झाल्याचे सांगितले.
मात्र, या वक्तव्यावर सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी तीव्र आक्षेप नोंदवत मुख्यमंत्र्यांवर धडधडीत खोटे बोलण्याचा आणि खोटा शवविच्छेदन अहवाल सादर करून जनतेची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विजयाबाई यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना पोलिसांच्या मारहाणीमुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा केला आणि सरकारने या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालू नये, अशी मागणी केली.
फडणवीसांचे विधानसभेतील वक्तव्य काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या प्रकरणात दोन वेगवेगळे शवविच्छेदन अहवाल समोर आले आहेत. पहिल्या अहवालात मृत्यूचे कारण ‘शॉक फॉलोइंग मल्टिपल इंज्युरीज’ असे नमूद होते, तर हिस्टोपॅथॉलॉजी अहवालात ‘ट्रिपल व्हेसल डिसीज’मुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
यामुळे संभ्रम निर्माण झाल्याने हे दोन्ही अहवाल मुंबईतील जे.जे. शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. जे.जे. रुग्णालयाच्या अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू ‘कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अक्युट कोरोनरी सिंड्रोम’मुळे झाल्याचे नमूद आहे. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सरकारने यासाठी चौकशी आयोग नेमला असून, त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतरच याबाबत ठोस निष्कर्ष काढला जाईल.
विजयाबाई सूर्यवंशींचा टाहो
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात धडधडीत खोटे बोलून संपूर्ण महाराष्ट्राला कलंक लावला आहे. त्यांचे वक्तव्य ऐकून माझ्या पायाखालची वाळू सरकली.
माझ्या मुलाला कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अटक केली आणि पोलीस ठाण्यात नेऊन मरेपर्यंत मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नेण्यात आला, जिथे MBBS डॉक्टरांनी कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदन केले. त्या अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले की, पोलिसांच्या मारहाणीमुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला.”
विजयाबाईंनी पुढे आरोप केला की, “कुणीही माझी किंवा न्यायालयाची परवानगी न घेता जे.जे. रुग्णालयात खोटा शवविच्छेदन अहवाल तयार केला. या बनावट अहवालाच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटे वक्तव्य केले. मी त्यांना विनंती करते की, त्यांनी खोटे बोलू नये आणि आरोपींना पाठीशी घालू नये. सुरुवातीचा अहवाल खरा आहे, तोच महाराष्ट्राला सांगावा. खोटे अहवाल सादर करून किती जणांची फसवणूक करणार?”
विजयाबाईंनी सांगितले की, परभणीतील कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अनेकांना मारहाण केली. “या ऑपरेशनमध्ये अनेक तरुणांचे हात-पाय मोडले, काही अपंग झाले, तर काही महिलांनाही गंभीर दुखापत झाली. माझे लेकरू त्यात मारले गेले. सरकारने या प्रकरणात न्याय द्यावा. न्यायालयाने अशा खुनाच्या प्रकरणात सात दिवसांत आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचे पालन व्हायला हवे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी फडणवीसांवर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा इतर ठिकाणांहून खोटे अहवाल आणून महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप केला.





