Someshwar Sugar Factory: एफआरपीपेक्षाही जास्त दर! सोमेश्वर कारखान्याचा मोठा धमाका; पाहा यंदा तुमच्या खात्यात किती रुपये जमा होणार?
Someshwar Sugar Factory: १२.२७ टक्के साखर उताऱ्यासह १५ लाख क्विंटलहून अधिक साखरेचे उत्पादन; उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार.

Someshwar Sugar Factory – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रति मे. टन ४ हजार रुपये असा ऐतिहासिक अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. त्यामुळे अनुदानासह राज्यातील सर्वाधिक ऊसदर जाहीर करणारा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी याबाबत माहिती दिली.
कारखान्याने यापूर्वी नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात तुटलेल्या उसासाठी प्रति मे. टन ३,८०० रुपये, फेब्रुवारीतील उसासाठी ३,९०० रुपये, तर मार्चमधील उसासाठी ४ हजार रुपये असा दर जाहीर केला होता. आता अंतिम दरात अनुदानाचा समावेश करून प्रतिटन ४ हजार रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. मागील गाळप हंगामात कारखान्याने सुमारे १२ लाख १८ हजार मे. टन उसाचे गाळप केले.
यावेळी सरासरी १२.२७ टक्के साखर उतारा राखत सुमारे १५ लाख ५७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. याशिवाय को-जनरेशन प्रकल्पातून वीजनिर्मिती व वीजविक्री, तसेच डिस्टिलरी प्रकल्पातून अल्कोहोल व इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले. एफआरपीपेक्षा अधिक ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवत यंदाही सभासदांच्या खात्यावर अतिरिक्त रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, “गेल्या पाच हंगामांपासून आम्ही सरासरी प्रतिटन ३,८०० रुपयांच्या आसपास विक्रमी ऊसदर देत आलो आहोत. यापुढेही सर्वोच्च ऊसदर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध राहील. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी व वाहतूकदार यांच्या सहकार्यामुळे सोमेश्वर कारखान्याची ऊसदराची परंपरा कायम राहिली आहे.”
यंदाच्या हंगामातही सर्वोच्च दराचे आश्वासन.
सन २०२६-२७ गाळप हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात सुमारे ३९ हजार एकर उसाची नोंद झाली आहे. आगामी हंगामात अंदाजे १२ ते १२.५० लाख मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत आगामी हंगामातही सर्वोच्च ऊसदर देण्याचा निर्धार कारखाना व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.





