Someshwar Sugar Factory : सोमेश्वरचा ‘साखर’धडाका! १० लाख टनांचा टप्पा पार; साखर उताऱ्यात जिल्ह्यात पुन्हा मारली बाजी
Someshwar Sugar Factory : १०७ दिवसांत १० लाख ७ हजार मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण; ११ लाख ६४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेत सोमेश्वरची घोडदौड सुरूच.

Someshwar Sugar Factory – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात १० लाख टनांचा महत्त्वपूर्ण टप्पा (दि. १५) यशस्वीरित्या पार केला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अजून सुमारे तीन लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असून गाळप हंगाम २० मार्चपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे एकूण गाळप १३ लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमेश्वरचे गाळप हे मार्चअखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. सोमेश्वर कारखान्याने आतापर्यंत १० लाख ७ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून ११ लाख ६४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून ११.५९ टक्के साखर उताऱ्यासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्यातील बहुतांश सहकारी व खासगी साखर कारखाने हंगाम बंद करत असताना जिल्ह्यात सध्या सोमेश्वरसह माळेगाव, विघ्नहर, भीमाशंकर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे.
यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून कारखान्याने १०७ दिवसांचा गाळप कालावधी पूर्ण केला आहे. सुरुवातीच्या काळात काही खासगी कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस नेण्याचा प्रयत्न केला; मात्र, सभासदांचा कारखान्यावर असलेला विश्वास आणि संचालक मंडळाची ठाम भूमिका यामुळे शेतकऱ्यांनी सोमेश्वरलाच प्राधान्य दिले.
उशिरा येणाऱ्या उसाला अनुदान
सोमेश्वर कारखान्याची वाढलेली गाळप क्षमता, ऊस तोडणीचे नियोजन, प्रशासन व संचालक मंडळाची तत्परतेमुळे दररोज नऊ हजार मेट्रिक टनांहून अधिक क्षमतेने गाळप सुरू आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात गाळपासाठी येणाऱ्या उसाला विशेष अनुदान जाहीर करण्यात आल्याने सभासद शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. कारखान्याचे सर्व प्रकल्प सुरळीत सुरू असून सर्वांगीण प्रगतीमुळे यंदाच्या हंगामातही सोमेश्वर कारखान्याने दमदार कामगिरीची नोंद केली आहे. एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याची परंपराही कारखान्याने कायम राखल्यामुळे सभासदांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.





