Nira River Pollution – श्री सोमेश्वर सह साखर कारखान्याकडून सांडपाणी अथवा केमिकलयुक्त पाणी नीरा नदीमध्ये सोडले जात नसल्याचे कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून स्पष्ट केले आहे, असे कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. दरम्यान, कारखाना परिसरात एकही उद्योग प्रकल्प नसताना नीरा नदीत केमिकलयुक्त पाणी कोठून येते, असा संतप्त सवाल कोऱ्हाळे खुर्द परिसरातून उमटत आहे. याबाबत कारखाना प्रशासनाने घूमजाव केल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. कारखान्यामध्ये अत्याधुनिक व पर्यावरणपूरक ईटीपी प्रकल्प कार्यरत असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाते. प्रकल्पामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अशा तिन्ही स्तरांवर सांडपाण्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्यामुळे प्रक्रियायुक्त पाणी पूर्णतः सुरक्षित व पुनर्वापरासाठी योग्य ठरते. हे पाणी इरिगेशनसाठी तसेच कारखाना परिसरातील हरित क्षेत्रासाठी वापरण्यात येत असून “झिरो डिस्चार्ज” संकल्पनेनुसार कारखाना कार्यरत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने कारखान्याने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ३५ एकर क्षेत्रात ‘नक्षत्र वनउद्यान’ विकसित केले आहे. उपक्रमाअंतर्गत ५५०० देशी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड केली असून, त्यामध्ये २.५ एकर क्षेत्रात मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्षारोपण केले आहे. उत्पादन, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांत संतुलित प्रगती साधणारा श्री सोमेश्वर कारखाना हा परिसरासाठी एक आदर्श प्रकल्प ठरत असल्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले.