आणखी काही संजय राऊत निर्माण होतील आणि भाजपाच्या अत्याचाराविरुद्ध लढतील – सुनिल राऊत

मुंबई – सध्या तुरूंगात असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांचे बंधु सुनील राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर थेट दिल्ली गाठली. दिल्लीत ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी चर्चा करून कथित सेटलमेंट करणार असल्याची पतंगबाजी त्यानंतर सुरू झाली. मात्र त्यावर सुनील राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दिल्लीत संजय राऊत यांचे घर आहे. त्यासाठी दिल्लीत आलो होतो. दिल्लीला येण्यापूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. संजय राऊतांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार नाही. सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. संजय राऊतांवर ठेवण्यात आलेल्या आरोपपत्राला काडीचीही किंमत नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली, असा आरोप सुनिल राऊत यांनी ईडीवर केला आहे.
भाजपाकडून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. संजय राऊत भाजपाच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध बोलत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली. मात्र, संजय राऊतांच्या अटकेमुळे आवाज बंद होणार नाही. आणखी काही संजय राऊत निर्माण होतील आणि भाजपाच्या अत्याचाराविरुद्ध लढतील, असा हल्लाबोल सुनिल राऊत यांनी भाजपावर केला आहे.





