Solar Subsidy : सौरऊर्जेचे स्वप्न होणार साकार! सौर पॅनलसाठी केंद्रासोबत राज्य सरकारकडूनही अनुदान! जाणून घ्या पात्रता

प्रभात वृत्तसेवा
पुणे : राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील घरगुती वीज ग्राहकांना घरांवर आता सौरउर्जा यंत्रणा उभारण्यासाठी राज्यशासनाकडून विशेष अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी राज्यशासनाकडून ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ३ लाख ४५ हजार ३७८ ग्राहकांना तसेच सुमारे १ लाख ५४ हजार ६२२ दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना सौरऊर्जा प्रकल्पासाठीचे अनुदान दिले जाणार आहे.
त्यामुळे, या निवासी मिळकतींना आता केंद्रासोबत राज्याचेही अनुदान मिळणार आहे. यासाठी चालू आर्थिक वर्षात ३३० कोटी आणि २०२६-२७ मध्ये ३२५ कोटी, अशी एकूण ६५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.केंद्रशासनाने सरकारने ५०० गिगावॅट अपारंपारिक ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य ठेवले असून, त्यापैकी ८.७५ लाख सौरप्रणाली महाराष्ट्रातील घरांवर बसविण्याचे उद्दिष्ट आहे.
त्यात प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार, शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील वीज ग्राहकांना ३५ टक्के, १०० युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या सर्वसाधारण गटांना २० टक्के, अनुसूचित जाती-जमाती गटांना प्रत्येकी ३० टक्के अनुदान राज्य सरकारकडून दिले जाणार आहे.





