Solapur Rainfall : पंढरपुरात चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याचा वेढा कायम; मुसळधार पावसाने शेतकरी हवालदिल

Solapur Rainfall – सोलापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असून, पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. धाराशिव जिल्ह्यातही पाऊस बरसत असल्याने सीना नदीला पुन्हा पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सीना नदीत सध्या चांदणी प्रकल्पातून ९ हजार ४२२, खासापुरीमधून २२ हजार ६६८, सीना कोळेगावमधून ६० हजार ५००, तर भोगावती नदीमधून २९ हजार ७०० असा एकूण एक लाख २२ हजार ३१० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी आणि पाकणी गावासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत अत्यंत विदारक परिस्थिती आहे. उजनी धरणातून १ लाख १६०० क्युसेस व वीर धरणातून भीमा नदीत ७ हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. या पाण्याने ८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर, पंढरपूर येथे चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने दिलेला वेढा कायम आहे.
तर पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली जाणार असल्याने यावरील वाहतूक बंद होणार आहे. भीमा (चंद्रभागा) नदीला पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.
तसेच भीमा नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे पंढरपूर, विष्णूपद, मुंढेवाडी, गुरसाळे, कौठाळी, पिराची कुरोली, पुळूज, आव्हे हे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरुन होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. याबाबत प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ परवडला, अशी एक म्हण प्रचलित होती. परंतु, मागील अनेक शतकानंतर अतिवृष्टी, महापुरांमुळे जनावरांचा चाराही वाहून गेला. यातून प्रश्न बिकट बनत चालला आहे. मुक्या जनावरांचीही परीक्षा निसर्ग का घेत आहे, असा प्रश्न पशुपालकांना सतावत आहे.
इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही शासनाकडून चारा पुरवठा करण्याची वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या परिसरातील सुमारे ८८ गावांना महापुराचा फटका बसला आहे. तर कुरनूर धरण, हरणा नदी, बोरी नदीसह अन्य ठिकाणी अतिवृष्टीने चाऱ्यासह पिकांचेही अतोनात नुकसान झाल्याने आता चाऱ्याचा प्रश्न भीषण बनत चालला आहे.
सांगली आणि सांगोला येथील महूदमधून १०० मेट्रिक टन चारा घेऊन वाहने दाखल झाली आहेत. गावागावांतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. रस्ते चिखलमय झाले असून अनेक घरांमध्ये अजूनही पाणी व चिखल साचलेला आहे.
शेतात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सुमारे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. चार हजारांहून अधिक व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थालांतरित करण्यात आले आहे.





