मनापासून : माध्यम चांगले; प्रश्न वापराचा

सोशल मीडियाने ज्या वेगाने लोकांच्या जीवनात प्रवेश केला आहे, त्याचे दुष्परिणामही त्याच वेगाने समोर येत आहेत.
सोशल मीडियाचा उघडपणे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अफवा पसरवण्यासाठी दुरुपयोग केला जातोच. अशा परिस्थितीत देशाची सामाजिक जडणघडण कायम राखणे हे मोठे आव्हान बनले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. सोशल साइट्सवरील लोकांची व्यग्रता पाहून असे वाटते की, लोक त्याच्याशिवाय अजिबात राहूच शकत नाहीत. सोशल मीडियाचा भरपूर वापर करणाऱ्या मुलांना सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी या साइट्स पाहण्याची सवय लागली आहे. ज्ञान वाढविणे, लोकांशी संवाद राखणे यासह सर्वच विषयांत या व्यासपीठाने चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत यात शंकाच नाही.
या हायटेक युगात सोशल मीडियावर असणे गरजेचे बनले आहे. याला नाइलाज म्हणा किंवा काळाची गरज म्हणा, पण ते टाळणे अशक्य झाले आहे; परंतु आपली मुले जेव्हा त्यात अडकतात, तेव्हा समस्या जेव्हा निर्माण होतात. मुले अशा प्रकारे या जाळ्यात गुरफटून जातात, जणूकाही त्यांना सोशल मीडिया हे एक व्यसनच लागले आहे. याखेरीज मुले यामुळे वेगवेगळ्या अडचणींमध्येही सापडू शकतात. या प्रभावामुळे सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्यामुळे होणारे मानसिक दुष्परिणाम यांच्या बातम्या सतत येत आहेत.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, जी मुले सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर करतात, त्यांच्या मनात जीवनाबद्दल अधिक असंतोष असतो. मुलांना सोशल मीडियावर लोकांना पाहण्याची इतकी सवय होते की ते आपल्या पालकांकडून भलत्यासलत्या गोष्टींची मागणी करू लागतात. तासन्तास ऑनलाइन राहण्याच्या या सवयीमुळे मुलांना त्यांचे छंद जोपासायला किंवा आत्मपरीक्षण करायलाही वेळ मिळत नाही. मुलांवर ताण येत आहे. या तणावामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व, वागणूक, विचार आणि करिअर या सर्वांवरच दुष्परिणाम होत आहेत. लहान मुलेही अनेक प्रकारच्या नैराश्याचे आणि गुन्हेगारीचे बळी ठरू लागली आहेत. या प्रकरणांमध्ये बहुतेक पालकांना एखादी अप्रिय घटना घडल्यावरच माहिती मिळते. अनेक प्रकरणांवरून असे दिसते की, सोशल मीडिया हे मुलांसाठी धोकादायक साधन म्हणूनच उदयास येत आहे.
सोशल मीडियाच्या मर्यादित वापरातून फायदेही मिळू शकतात. सोशल मीडियाच्या मर्यादित वापरामुळे समवयस्कांशी जलद आणि चांगले संबंध प्रस्थापित करणे शक्य झाले आहे. सोशल मीडियावरून आवश्यक माहिती देणे किंवा घेणे सोपे झाले आहे. सोशल मीडियावरून अभ्यासाचे साहित्य शेअर करण्याची सोय आहे. तसेच, सोशल मीडियामुळे मिळणारी कौशल्ये भविष्यात उपयुक्त ठरू शकतात. तंत्रज्ञान आणि गॅझेट्सची माहिती सोशल मीडियावरून मिळवली पाहिजे. सोशल मीडियावरून प्रोफाइल, डिझाइन आणि नेटवर्किंग कौशल्ये शिकता येतात. सोशल मीडिया सर्जनशील शौकिनांना त्वरित अभिप्राय मिळवून देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.
सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम म्हणून उदयास आले असून, राजकीय पक्षही त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत, हे नाकारता येत नाही. मात्र, त्यामुळे फायदाच होईल असे नाही, तर काही पक्षांच्या प्रतिमेलाही हानी पोहोचते. साहजिकच सोशल मीडिया नावाचे हे अस्त्र सामान्य लोकांच्या हाती आले असून, येत्या काळात त्याची मारक शक्ती आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत त्याचा गैरवापर रोखण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. अडचण अशी आहे की, हे शस्त्र समाजकंटकांकडून जितके वापरले जाण्याची शक्यता आहे, तितकाच धोका त्याला राजकीय पक्षांकडून आहे. पक्षांकडून त्यांच्या संकुचित हितसंबंधांसाठी त्याचा लोकशाहीविरोधी मार्गाने वापर केला जाण्याची शक्यता आहे.
युनिसेफच्या मते, 18 ते 24 वयोगटातील 7 पैकी एक भारतीय तरुण नैराश्याने ग्रस्त आहे. आपल्या देशात नैराश्य किंवा मानसिक आरोग्यावर होणारी चर्चा लोक सहजासहजी स्वीकारत नाहीत आणि त्याबद्दल लोकांना जागरूक करण्याचे प्रयत्न केले जात असले तरीही त्या संदर्भातील पुराणमतवादी विचार लोकांच्या मनातून पूर्णपणे काढून टाकला जाऊ शकत नाही. आत्मसन्मानाचा अभाव, संवादात अडचण, एकाग्रता याव्यतिरिक्त नैराश्याने ग्रस्त व्यक्तीमागे स्वतःला हानी पोहोचविण्याजोगी लक्षणेही दिसून येतात.
तरुणांमध्ये नैराश्याच्या वाढत्या प्रमाणामागील एक कारण म्हणजे या वयातील लोकांचा सोशल मीडियावर अधिक वेळ जातो. अस्सल, माहितीपूर्ण आणि तार्किक म्हणता येईल, असे फार थोडे विषय असतील; पण या बड्या कंपन्या आपली प्रायव्हसी विकून कोट्यवधींचा नफा कमावत आहेत. भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज पोर्टल इत्यादींसाठी कोणतीही जबाबदारीविषयक संहिता अस्तित्वात नाही. यामुळे अनेक मर्यादा आधीच ओलांडल्या गेल्या आहेत. श्रद्धांची खिल्ली उडवली जाते आणि संबंधित व्यक्ती अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बिळात जाऊन लपते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यही अमर्यादित नसते, असे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे.
आजच्या गतिमान युगात लोकांना एकमेकांच्या जवळ आणण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे; परंतु या सोशल मीडियाचा वापर हिंसाचार, अफवा पसरवणे आणि तत्सम देशविरोधी आणि समाजविरोधी कृत्ये करण्यासाठी होतो. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारनेही अनेक पावले उचलली आहेत; परंतु या दिशेने बरेच काही व्हायचे बाकी आहे. कारण, सोशल मीडियाच्या क्षेत्रात दररोज वेगवेगळी, नवनवीन आव्हाने उभी राहात आहेत.





