…तर आपणही मेरिटमध्ये येऊ – सुप्रिया सुळे
पुणे – सलग 45 दिवस केलेल्या अभ्यासानंतर माझा मुलगा मेरिटमध्ये येतो. तर “नाना देवकाते’ आपल्याकडेही तेवढेच दिवस आहेत. त्यामुळे आपणही मेरिटमध्ये येऊ शकतो, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पाहात व्यक्त केला. त्यामुळे कोणी कितीही कोलांटउड्या मारल्या मारूद्या, जेवढे राहिलो तेवढे मिळून आपल्याला अगामी विधानसभा निवडणुकीत एकजुटीने मेरिटमध्ये यायचे आहे, असे सूचक व्यक्तव्य सुळे यांनी यावेळी केले.
राजकारणात सध्या सुरू असलेल्या “इनकमिंग’ आणि “आऊटगोईंग’मुळे विरोधी पक्षात खलबते सुरू आहे. अशा परिस्थितीत पक्षाकडून कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी मिळणार त्याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे. पुणे जिल्ह्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही पदाधिकारी भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे कोण, कधी, कुठे, कसा उडी मारेल याची शाश्वती नाही. त्यातच जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमादरम्यान खासदार सुळे या शिक्षण पद्धती या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करत होत्या.
त्यावेळी स्वत:च्याच दोन्ही मुलांचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या, माझ्या मुलाला गणित विषयात केवळ 40 ते 50 गुण पडत होते. बोर्डाच्या परीक्षेला 45 दिवस राहिले असताना, त्याच्याच शाळेतील शिक्षिकेने त्याला दिलेल्या शिकवणीमुळे तो “मेरीट’मध्ये आला. त्यासाठी शिक्षिकेने काय जादू केली तिलाच माहित. परंतु, यश मिळविण्यासाठी केवळ तंत्रज्ञानाची नाही तर मेहनत, कार्यपद्धती आणि कार्यक्षमता महत्त्वाची आहे. “नाना देवकाते आपण नापास झालो तर काय होवू शकते’. असे म्हणत आपल्याकडेही 45 दिवस आहेत. त्यामुळे आपणही मेरिटमध्ये येऊ शकतो, असे सुळे म्हणाल्या.





