“….म्हणून त्यांना एकही जागा मिळालेली नाही”; CM फडणवीसांनी सांगितलं ठाकरे बंधूंच्या पराभवाचं नेमकं कारण
Devendra Fadnavis : बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संयुक्त पॅनेलला मोठा पराभव पत्करावा लागला. 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल ठाकरे बंधूंना मोठा धक्का मानला जात आहे.
या निवडणूकीत शशांक राव यांच्या पॅनलचे 14 उमेदवार निवडून आले आहेत. तसेच प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले आहेत. अशातच आता ठाकरे बंधुंच्या या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
पुण्यात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधुंच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीतील पराभवाबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘माझं हे मत होतं की, अशाप्रकारच्या पतपेढीच्या निवडणूकीचे राजकीयकरण करु नये. मात्र ठाकरे बंधुंनी त्याचं राजकारण केलं. शशांक राव आणि प्रसाद लाड हे आमचे नेते आहेत, मात्र आम्ही राजकीयकरण केलं नाही.’
पुढे बोलताना, ‘आता दोन ठाकरे बंधु एकत्र आले, आता ठाकरे ब्रँण्ड निवडून येणार असं त्यांनी राजकीयकरण केलं. मात्र हे राजकीयकरण लोकांना आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे त्यांना एकही जागा मिळालेली नाही, या निवडणूकीत तरी त्यांना लोकांनी रिजेक्ट केलं आहे असं चित्र दिसत आहे’ असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले? पाहा…
एकनाथ शिंदे म्हणाले, “बेस्ट पतपेढीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली, आता काय म्हणणार? तरीही त्यांचा पराभव झाला. जेव्हा ते लोकसभा जिंकतात, तेव्हा ईव्हीएमला दोष नसतो, पण पराभव झाला की ईव्हीएम आणि निवडणूक आयोग दोषी ठरतात. जनतेने पुन्हा एकदा त्यांना नाकारले. घरी बसणाऱ्यांना जनता स्वीकारत नाही. ब्रँडचा बँड वाजवण्याचे काम जनता करते.”
शिंदे यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा दाखला देताना सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री असताना लोकाभिमुख निर्णय घेतले. “लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, ज्येष्ठांसाठीच्या योजना आम्ही सुरू केल्या. महायुतीची दुसरी इनिंग आता सुरू आहे. आम्ही एकजुटीने लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काम करत आहोत,” असे शिंदे म्हणाले.
त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 232 जागांच्या विजयाचा उल्लेख करत जनतेने त्यांच्या कामाला पोचपावती दिल्याचा दावा केला. “त्यांनी आमच्या योजनांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण लाडक्या बहिणींनी त्यांना जोडा दाखवला. जनता कामाची पावती देते,” असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.





