….तर आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात: अमोल मिटकरींचे विधान; तटकरेंनी घेतला समाचार, थेट म्हणाले….

Amol Mitkari | Sunil Tatkare | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. याबाबत दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट केली होती. अशातच अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत विधान केल्याने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असे विधान मिटकरी यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
पक्षातील एखाद्या वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली की कोणी त्याच्यावर बोलण्याची गरज नाही, असे म्हणत तटकरे यांनी मिटकरांना फटकारले. तसेच अमोल मिटकरी यांनी आता बोलताना जपून वक्तव्य करावे, असे म्हणत त्यांचे कानही टोचले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून यासंदर्भात स्पष्टपणाची भूमिका मांडली आहे, असेही तटकरेंनी स्पष्ट केले.
एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा सामुदायिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घेतला आहे. त्यामुळे आम्ही घेतलेल्या भूमिकेत ज्यांना यायचे त्यांनी यावं, असे तटकरे म्हणाले. त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यावर स्पष्टपणे भूमिका मांडत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी भूवया उंचावणारे विधान केले आहे. पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले आहेत. मात्र, त्यांच्या या विधानावर पक्षातील बड्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
जय्यत तयारी
१० जूनला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या वर्धापन दिनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेवाडी संकुल येथे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचा बालगंधर्व रंगमंदिर येथे वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे. दोन्ही ठिकाणच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.





