पुणे जिल्हा | …तर गुंजवणीचे काम दीड वर्षांत पूर्ण

परिंचे, (वार्ताहर) – गुंजवणी धरणातील जलवाहिनीच्या रखडलेल्या कामाला पुन्हा सुरुवात झाली असून मी पुन्हा मंत्री झालो तर येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.
परिंचे (ता. पुरंदर) येथे गुंजवणी धरणातील जलवाहिनीच्या रखडलेल्या कामाला लाभार्थी 16 गावच्या शेतकरी, सरपंच, उपसरपंच यांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते पूजन करुन शुभारंभ करण्यात आला,
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, दिलीप यादव, अतुल म्हस्के, हरिभाऊ लोळे, निलेश जगताप, उत्तमराव धुमाळ, अर्चना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
विजय शिवतारे म्हणाले की, हा पुरंदर तालुक्यासाठी सुवर्ण दिवस असून शनिवारी (दि. 12) 20 वर्षांपूर्वी केलेल्या मूळ आराखड्या प्रमाणे या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या योजनेचा संपूर्ण सर्व्हे मी स्वतः पायी चालत पूर्ण केला होता. या योजनेचे मुख्य लाभार्थी परिंचे, वाल्हे आणि बारा वाड्या, राख, गुळुंचे असून या भागाला प्रथम पाणी मिळणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूळ आराखड्यात बदल न करता या योजनेला निधी कमी पडणार नसल्याचे सांगितले असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
बंद पाइपलाइनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणारी ही पहिलीच योजना आहे. या योजनेतून ओढे-नाले तसेच परिसरातील जलाशय भरण्याची व्यवस्था असून ही योजना पूर्ण करण्यासाठी उपोषण, पायी चालत आंदोलन आदी गोष्टी करून अनेक शारीरिक धोके पत्करून या योजनेसाठी योगदान दिले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना नेते समीर जाधव, सूत्रसंचलन सोपान राऊत यांनी तर सागर करवंदे यांनी आभार मानले.
आमदार जगतापांवर टीका
बंद पाइपलाइनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणारी ही पहिलीच योजना आहे. या योजनेतून ओढे-नाले तसेच परिसरातील जलाशय भरण्याची व्यवस्था असून ही योजना पूर्ण करण्यासाठी उपोषण, पायी चालत आंदोलन आदी गोष्टी करून अनेक शारीरिक धोके पत्करून या योजनेसाठी योगदान दिले आहे.
तुम्ही पाणी योजना पूर्ण केली असती तर दुष्काळात चारा आणि पाणी वाटायची वेळ आली नसती. पुरंदर उपसा योजना सुरळीत चालवता आली नसल्याची टीका विजय शिवतारे यांनी आमदार संजय जगताप यांच्यावर केली.
ही दिली अश्वासने
पुरंदर तालुक्यातील विमानतळ, आयटी कंपन्या, बाजारपेठ आदी गोष्टी पूर्ण करण्यासाठी तालुक्यात राज्यपातळीवर नेतृत्व माझ्या रुपाने असून पुढील काळात पुरंदरमधील रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे आश्वासन विजय शिवातारे यांनी दिले आहे.





