राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष ? हडपसर लक्ष्मी कॉलनी ते शेवाळेवाडी फाटा महामार्गाची वाट ‘बिकटच’ हडपसर : हडपसर रवीदर्शन ते द्राक्ष संशोधन केंद्र यादरम्यान पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात येत आहे. हे काम गेले अनेक दिवसापासून अर्धवट स्थितीत बंद आहे. याशिवाय या महामार्गावर लक्ष्मी कॉलनी ते मांजरी उपबाजार दरम्यान गॅस वाहिनी टाकण्यासाठी खोदलेला रस्ता अर्धवट स्थितीत ठेवण्यात आला आहे. खोदलेल्या अर्धवट कामामुळे वाहतूक सुरळीत होत नाही. यामुळे येथे अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्याकडून येतील स्थितीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला वारंवार कळवूनही संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो आहे. गेली अनेक महिन्यापूर्वी येथील गॅस वाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने व कंपनीने काम झाल्यानंतर खोदलेला रस्ता तसाच अर्धवट स्थितीत सोडून दिला आहे याशिवाय पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर येतील रवी दर्शन ते द्राक्ष संशोधन केंद्र दरम्यान सुस्थितीतील रस्त्यावर पुन्हा रस्त्याचे काम हाती घेतलेल्या ठेकेदारांनेही काम अर्धवट स्थितीत ठेवले आहे . केलेले कामही काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाले आहे. असा आरोपही अनेकांनी केला आहे. या दोन्ही कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार कळविले आहे.मात्र, संबंधित अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जातो आहे. लक्ष्मी कॉलनी ते मांजरी उपबाजार दरम्यान अर्धवट कामामुळे वाहतुकीला शिस्त नाही. चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. गेल्या महिन्याभरात येथील अर्धवट कामामुळे खडीवरून घसरून तसेच पडलेल्या खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्याने वाहने घसरून अनेकांना गंभीर दुखापतीसह किरकोळ दुखापतीचा सामना करावा लागला आहे . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच काम करणाऱ्या ठेकेदाराला याचे सोयरसुतक नाही. खोदलेला महामार्ग तसेच अर्धवट स्थितीत ठेवलेले काम .झालेले रस्त्याचे निकृष्ट काम तसेच होणारे आरोप याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे उपअभियंता महेश पाटील तसेच शाखा अभियंता अतुल सुर्वे यांच्याशी वारंवार संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही. “पुणे- सोलापूर महामार्ग रवीदर्शन ते कवडीपाट टोलनाका दरम्यान अतिशय सुस्थितीत होता.तरीही यावर करोडो रुपयांचा निधी टाकून रस्ता केला जात आहे. केलेला रस्ता अतिशय निकृष्ट पद्धतीचा झाला आहे. थोड्या पावसातच रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत .डांबर व खडी निघून गेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला असावा ,याची चौकशी केली जावी.” राहुल शेवाळे सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी,पुणे जिल्हा “लक्ष्मी कॉलनी ते शेवाळेवाडी दरम्यान सीएनजी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेला महामार्ग पुन्हा दुरुस्ती न करता चांगल्या असलेल्या रस्त्यावरती परत डांबर टाकले. तेही दहा-बारा दिवसात निघून गेले .ज्या बाजूला रस्ता बनवायचा होता तो कितीतरी दिवस झाले तसाच पडलेला आहे. त्यामुळे रोज अपघात होऊन कितीतरी नागरिक जखमी होऊन मृत्युमुखी पडत आहेत . संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर वरती गुन्हा दाखल व्हावा ,अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल.” उल्हास तुपे, जिल्हा प्रमुख, शिवसेना शिंदे गट,पुणे जिल्हा