Pune District : महाराष्ट्राचा बिहार झाला

सासवड : मला मंत्रिपद मिळाले नाही. याचे जास्त वाईट वाटत नाही. पण, महायुतीतील तिनही नेत्यांनी जी वागणूक दिली, ती अत्यंत चुकीची आहे. हे नेते साधे भेटायला देखील तयार नाहीत. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी 100 टक्के आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. राज्यात मंत्रीपद देताना प्रादेशिक समतोल राखला जात असे, परंतु आता बिहारप्रमाणे जातीय समतोल राखण्याला प्राधान्य दिले जात आहे, अशी टीका शिवसेनेचे (शिंदे) पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी केली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज शोक प्रस्तावा नंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर नागपूर येथील विधानभवन परिसरातून बाहेर पडताना विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवतारे बोलत होते. मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी महायुती सरकारच्या तिन्ही नेत्यांवर तोफ डागली. विजय शिवतारे पुढे म्हणाले की, वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार आहे.
त्यानुसार तुम्हाला आश्वासन देण्यात आले आहे का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिले तरी मी घेणार नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामे मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. मंत्रिपदाबाबत मला राग नाही. पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे. यामध्ये कोणाचे नाव घ्यायची गरज नाही. पण एक सौजन्य असायला हवे. आम्ही कार्यकर्ते म्हणजे कोणी गुलाम नाहीत ना? नाराजीचे कारण हे आहे, की अशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत.
विभागीयपेक्षा जातीय समतोलाला प्राधान्य
ज्याप्रकारे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तिन्ही नेत्यांकडून चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, ते सौजन्य सुद्धा त्यांनी दाखवले गेले नाही. ज्या प्रकारे महायुतीमध्ये असताना विरोधात उमेदवार उभे केले गेले. याबद्दल तिन्ही नेत्यांपैकी कोणीही कोणाला बोलत नाही. मंत्रीपद महत्त्वाचे नव्हते. पण माझी जी कपॅसिटी राज्याच्या विकासासाठी वापरायची गरज होती, ती आता वापरली जाणार नाही. माझे एकनाथ शिंदे यांच्याशी कोणतेही बोलणे झाले नाही. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण विभागीय समतोलापेक्षा जातीय समतोलाला प्राधान्य दिले जात आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.





