Vijay Shivtare : DPDC च्या बैठकीत शिवसेनेच्या आमदाराच नाव वगळलं; चर्चांना उधाण, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

पुणेः राज्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला भरघोस यश मिळाले. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेच्या खुर्चीवर आरुढ झाले. महायुतीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच पुणे जिल्ह्याच्या पारूप आराखड्यावर चर्चा करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील आमदारांना विकास कामांसाठीच्या निधी वाटपावर चर्चा करण्यात येणार आहे. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या बैठकीत आमदार राहुल कुल आणि सुनील शेळके यांची नावे समाविष्ठ करण्यात आली आहेत. तर शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना सदस्य समिती पदावरून वगळ्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील आमदारांना विकास कामांसाठी किती निधी मिळणार हे ठरणार आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रारुख आराखड्याला देखील मान्यता मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील लकरच होणाऱ्या असल्याने ही बैठक महत्वाची मानली जाते. पुणे जिल्ह्यात महायुतीमधील आमदारांमध्ये शिवसेना पक्षाचा एकच आमदार आहे.
आमदार विजय शिवतारे हे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार आहेत. ते पुरंदर विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. विजय शिवतारे हे एकमेव पुणे जिल्ह्यातील शिवसेना आमदार असल्याने त्यांना वगळ्यात आल्याने चर्चेला उधाण प्राप्त झाले आहे. आधीच पालकमंत्रीपदावर वाद सुरू असतानाच आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार विजय शिवतारे यांना वगळण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सासवडमध्ये आभार सभा
३१ जानेवारी या दिवशी सासवडच्या पालखी मैदानावर तत्कालीन मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आभार सभा होणार आहे. पुरंदरमध्ये पुन्हा एकदा भगवा फडवल्याबद्दल ही सभा होणार असल्याचे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. आता या सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार विजय शिवतारे कुणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





