RTO From Choice Number Sale| – नवीन कार किंवा दुचाकी खरेदी करताना बहुतांश नागरिक वाहनाचा क्रमांक मनासारखा (प्रामुख्याने व्हीआयपी) असावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी करतात. नवीन सिरीज सुरू होताच, मनपसंत क्रमांकाना मागणी अधिक वाढते. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) पुण्यात चॉइस क्रमांकासाठी नागरिकांनी तब्बल ५० कोटी रुपये मोजल्याचे दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत चॉइस क्रमांकाचे उत्पन्न ११ कोटींनी वाढल्याचे दिसून आले आहे.
एखाद्याने वाहन खरेदी केल्यावर त्यासाठी स्वत:ची किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख, जुन्या गाडीचा क्रमांक, एखादा लकी क्रमांक घेण्यास नागरिकांचा अधिक प्राधान्य असते. तर, काही जण व्हीआयपी क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करतात. आरटीओकडून देखील वाहनाच्या क्रमांकाची नवीन सिरीज सुरू झाल्यानंतर खास चॉइस क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जाते.
त्यानुसार नागरिक चॉइस क्रमांकासाठी अर्ज आणि विशिष्ट रकमेचा धनादेश दिला जातो. मात्र, बऱ्याच वेळेस एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज येतात. त्यावेळी लिलावाच्या माध्यमातून त्या क्रमांकाची विक्री केली जाते. जो वाहन चालक जास्त पैसे देईल त्याला तो क्रमांक लिलावाच्या माध्यमातून दिला जातो, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. RTO From Choice Number Sale|
एक क्रमांकासाठी मोजले १२ लाख रु.
एका चारचाकी वाहनधारकाने त्यांच्या कारला एक क्रमांक मिळावा यासाठी गेल्या वर्षात तब्बल १२ लाख रुपये मोजल्याची नोंद आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. पाच क्रमांकासाठी सहा लाख ६० हजार रूपये, ९९९९ क्रमांकासाठी सहा लाख मोजले आहेत. दुचाकीचा क्रमांक कारसाठी घेताना तीनपट रक्कम देऊन चॉईस क्रमांक घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. RTO From Choice Number Sale|
या क्रमांकांना सर्वाधिक मागणी
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) प्रामुख्याने १, ९, ९०, ९०९, ९९९, ९९९०,९९९९, ७, ७७, ७७७, ७००७, ७७७७, १२, १२१२, ४१४१, २१२१, ७२७२, ५५५, ५५५५, ४४४४, ९६, १००, ५००, ५०५, १००१, ११११, ३००३, ५०५०, ५१५१५ या क्रमांकाला मोठी मागणी असल्याचे दिसून आले आहे.
वर्ष चॉइस क्रमांकांमधून मिळालेला महसूल
२०२२-२३ ३८ कोटी १९ लाख ६५ हजार रु.
२०२३-२४ ४९ कोटी ८२ लाख ८४ हजार रु.
हेही वाचा:
दुचाकीपेक्षा कार विक्री अधिक जोमात; 7 हजारहून अधिक वाहनांची खरेदी