Snake Bite Safety: पावसाळ्यात सापांचा वावर वाढला! ‘या’ ४ विषारी सापांपासून स्वतःला कसं वाचवायचे; जाणून घ्या
Snake Bite Safety: शेतकरी आणि नागरिकांनो निष्काळजीपणा नको! रात्री टॉर्चचा वापर करा अन् पायात गमबूट घाला; वन्यजीव संस्थेचा मोलाचा सल्ला.

Snake Bite Safety – पावसाळ्याला सुरुवात होताच जुन्नर तालुक्यात साप मानवी वस्तीकडे येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे सापांची बिळे पाण्याने भरून जातात किंवा बुजतात. त्यामुळे आसरा आणि भक्ष्याच्या शोधात साप घरांच्या परिसरात, शेतामध्ये, गोठ्यात तसेच मानवी वस्तीत प्रवेश करतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणे आवश्यक असल्याचे आवाहन वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू संस्था, जुन्नर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जुन्नर तालुका हा शेतीप्रधान असून येथे नद्या, नाले, धरणे, डोंगररांगा आणि घनदाट नैसर्गिक परिसर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विविध प्रजातींच्या सापांचे वास्तव्य आढळते. विशेषतः पावसाळ्यात धामण, नाग, मण्यार, घोणस यांसारखे साप वारंवार मानवी वस्तीत दिसून येतात. काहीवेळा निष्काळजीपणामुळे सर्पदंशाच्या घटना घडतात. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांनी रात्री टॉर्चचा वापर करणे, पायात बूट किंवा गमबूट घालणे,
घर परिसर स्वच्छ ठेवणे, सरपण किंवा लाकडाचे ढिगारे हलवताना काळजी घेणे, तसेच साप दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्रांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय घराजवळ किंवा शेतामध्ये जखमी वन्यप्राणी, पक्षी अथवा साप आढळल्यास त्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी जवळील सर्पमित्रांना त्वरित माहिती द्यावी. वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू संस्थेचे प्रशिक्षित सर्पमित्र कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी पोहोचून सुरक्षित रेस्क्यू करून संबंधित वन्यजीवाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे कार्य करतात.
संस्थेचे संस्थापक सर्पमित्र आकाश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष दीपक माळी, सतीश घाडगे, सुरेश गायकवाड, ऋषिकेश वावळ, प्रज्ञेश काशीकेदार, भाऊ घोडे, आदित्य हांडे, वैभव गावडे, माता कर्डिले, धोंडीभाऊ निमसे तसेच इतर सर्पमित्र दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क असून, रात्री-अपरात्री घरात, शेतात किंवा सार्वजनिक ठिकाणी निघालेल्या सापांचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना कोणतीही इजा न करता जंगलात सोडण्याचे कार्य सातत्याने करत आहेत.





