Woman Death In Lodge : ओतूरमध्ये खळबळ! लॉजवर आढळला विवाहितेचा मृतदेह; बंद खोलीत नेमकं काय घडलं?
Woman Death In Lodge : ओतूर येथील वाघिरे महाविद्यालयासमोर असलेल्या लॉजमध्ये अवसरी येथील ३१ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ.

Woman Death In Lodge – जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील अमृत लॉजमध्ये स्नेहल अमोल शिंदे (वय ३१, रा. अवसरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या संशयास्पद मृत्यूच्या घटनेमुळे ओतूर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस विविध मार्गांनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेली माहिती अशी की, ओतूर येथील वाघिरे महाविद्यालयासमोर असलेल्या अमृत लॉजमध्ये शनिवारी (दि. १६) सकाळी संबंधित महिला रूममधून बाहेर आली नाही. त्यामुळे लॉज चालकाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्यासह ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रूमची पाहणी केली असता संबंधित महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली.
तिला तात्काळ ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी लॉजमधील नोंदी, सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, हे अमृत लॉज शैक्षणिक संकुलाजवळ असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा व्यवसायांवर प्रशासनाने अधिक कडक लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी केली आहे.





