Rain Update : मुंबईसह राज्यभरात धुमशान.! अनेक नद्यांनी ओलांडली धोकापातळी, शाळांना सुट्टी जाहीर
Rain Update – राज्यभरात धुवाधार पाऊस सुरू आहे. मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्ये ५ जण बेपत्ता असून २००हून अधिक ग्रामस्थ अडकले आहे. अतिमुसळधार पावसामुळे मराठवाड्यात शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, एनडीआरएफची 1 टीम, एक लष्करी पथक आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून बचाव कार्य सुरू आहे.
मुंबईतील सखल भागात पाणी साचले असून पावसामुळे वाहतूक मंदावली आहे. तसेच लोकल वाहतूकही उशिराने सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे आणि कोकणात पुढील 48 तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खबरदारीच्या पार्श्वभूमी ठाणे, नवी मुंबई आणि बुलढाण्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुलढाण्यातील चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे फक्त या दोन तालुक्यातील शाळा उद्या बंद राहणार आहेत. दरम्यान पावसाचे अलर्ट लक्षात घेऊन उद्या शाळांना सुट्टी देण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु झाला. मुखेड तालुक्यात पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला. नांदेडमध्ये 4 ते 5 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळते. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पूरात अडकलेल्यांना एसडीआरएफरच्या टीमने बाहेर काढले.
बुलढाण्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. आज आणि उद्या तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे.
या अतिवृष्टीमुळे शहर आणि तालुक्यात बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले काठाच्या बाहेरून वाहत आहे. मन प्रकल्पाचे सर्व पाच दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून मन नदीकाठच्या गावांना व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने ओढे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे. विदर्भात होत असलेल्या पावसाचे पाणी हिंगोलीच्या ईसापूर धरणात येत आहे. त्यामुळे ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. याच पैनगंगेने रौद्ररूप धारण केल्याचे बघायला मिळत आहे.





