SL vs NZ 1st Test : कामिंडू मेंडिसची शतकी खेळी, न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटीत पहिल्या दिवशी श्रीलंका मजबूत स्थितीत…

Sri Lanka vs New Zealand 1st Test (Day 1 Stumps) : कामिंडू मेंडिसच्या (Kamindu Mendis) शानदार शतकाच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आपला डाव मजबूत केला आहे. गाॅले येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने सात गडी गमावून 302 धावा केल्या आहेत. कामिंडूशिवाय कुसल मेंडिसनेही अर्धशतक झळकावले आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत रमेश मेंडिस 14 धावांवर खेळत आहे. तर प्रभात जयसूर्याने पाच चेंडू खेळूनही अद्याप खाते उघडलेले नाही. पहिल्या दिवशी दोन षटकांचा खेळ कमी करण्यात आला. एकूण 88 षटके टाकण्यात आली.
कामिंडूची शतकी खेळी…
कामिंडूच्या शतकी खेळीने श्रीलंकेचा डाव सावरला अन्यथा घरच्या मैदानावर पहिल्याच दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर त्याची फलंदाजी कोलमडली असती. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दिमुथ करुणारत्ने बाद झाला. त्याला केवळ दोन धावा करता आल्या. दुसरा सलामीवीर पथुम निसांका आपला डाव 27 धावांच्या पुढे नेऊ शकला नाही. दिनेश चंडिमलही 30 धावा काढून माघारी परतला. दरम्यान, संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज अँजेलू मॅथ्यूज दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. तो काही वेळानंतर मैदानावर परतला पण फारसे योगदान देऊ शकला नाही. 116 चेंडूंचा सामना केल्यानंतर मॅथ्यूजला तीन चौकारांच्या मदतीने केवळ 36 धावा करता आल्या.
यादरम्यान कामिंडू एका बाजूला उभा राहून धावा काढत होता. धनंजय डी सिल्वा 11 धावा करून बाद झाला. यादरम्यान कामिंडूने आपले शतक पूर्ण केले. यानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. एजाज पटेलच्या चेंडूवर तो बाद झाला. कामिंडूने 173 चेंडूंचा सामना करत 11 चौकारांच्या मदतीने 114 धावा केल्या. त्याच्याआधी कुसल मेंडिस अर्धशतक पूर्ण करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. कुसलने 68 चेंडूंचा सामना करत सात चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.
गॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे झाले तर तिन्ही सत्रात बरेच चढ-उतार पहायला मिळाले. एकीकडे श्रीलंकेचा संघ दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांची धावसंख्या 300 धावांच्या पुढे नेण्यात यशस्वी ठरली, तर दुसरीकडे 7 विकेट्सही त्यांनी गमावल्या. न्यूझीलंडकडून पहिल्या दिवसाच्या खेळात विल्यम ओरूर्कने 3 तर ग्लेन फिलिप्सने 2 बळी घेतले. याशिवाय टीम साऊदी आणि एजाज पटेल यांनीही प्रत्येकी 1 बळी घेण्यात यश मिळविले.
Kamindu Mendis posted his 4th Test 💯 but fell to Ajaz Patel late on a tight first day in Galle. O’Rourke (3-54) claimed both openers & Angelo Mathews. Phillips (2-52) & a wicket each for Southee & Patel. Scorecard | https://t.co/yOYwdofZHz #SLvNZ pic.twitter.com/dHmT3Bg6ac
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 18, 2024
सातव्या कसोटीत चौथे शतक…
कामिंडू कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा नवा हिरो ठरत आहे. कामिंडू त्याचा केवळ सातवा कसोटी सामना खेळत असून त्याने 11 डावातच चार शतके झळकावली आहेत. या सामन्यापूर्वी कामिंडूने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. लॉर्ड्स आणि ओव्हल येथे त्याने अर्धशतके झळकावली होती. कमिंडू आता श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी डावात चार शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम मायकेल वॅनडॉर्टच्या नावावर होता, ज्यांनी 21 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. या शतकासह कामिंडूने डॉन ब्रॅडमनच्या विशेष विक्रमाची बरोबरी केली आहे, ज्यांनी कसोटीतील 11व्या डावात चौथे शतक झळकावले होते.
सर्वात कमी डावात 4 शतके झळकावणारे फलंदाज…
जॉर्ज हॅडली – 8 डाव
सुनील गावस्कर – 8 डाव
विनोद कांबळी – 8 डाव
हर्बर्ट सटक्लिफ – 9 डाव
एव्हर्टन वीक्स – 9 डाव
हॅरी ब्रूक – 9 डाव
ॲलन मेलविले – 10 डाव
नील हार्वे – 10 डाव
पीटर पॅर्फिट – 10 डाव
डॉन ब्रॅडमन – 11 डाव
कामिंदू मेंडिस – 11 डाव





