SL vs NZ 1st Test : प्रबथ जयसूर्याच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे लोटांगण, पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा धमाकेदार विजय….

SL vs NZ 1st Test : फिरकी गोलंदाज प्रबथ जयसूर्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 63 धावांनी पराभव केला. गाले येथील कसोटी सामना जिंकून लंकन संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विजयासाठीच्या 275 धावांच्या लक्ष्यासमोर किवी संघ 211 धावांवर गारद झाला. आता मालिकेतील दुसरा सामना 26 सप्टेंबरपासून गालेमध्येच होणार आहे. पुढील महिन्यात भारतात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यापूर्वी टीम साऊदीच्या संघासाठी हा पराभव चिंताजनक आहे.
सोमवारी पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा संघ कालच्या 207 धावांच्या धावसंख्येत केवळ 4 धावा जोडू शकला आणि 211 धावांवर सर्वबाद झाला. सामन्यात 9 विकेट घेतल्याबद्दल फिरकीपटू प्रबथ जयसूर्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला 68 धावांची गरज होती, पण त्यांच्या आशा लवकरच धुळीला मिळाल्या. लंकन संघाने न्यूझीलंडचा प्रमुख खेळाडू रचिन रवींद्रला झटपट बाद करत विजय संपादन केला. शेवटच्या दिवशी श्रीलंकेला सामना आटोपण्यासाठी केवळ 29 चेंडू लागले.
विजयासाठी 275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची दुसऱ्या डावात सुरुवात चांगली झाली नाही. संघाने पहिली विकेट अवघ्या 6 धावांवर गमावली. न्यूझीलंडला दुसऱ्या डावात मोठ्या भागीदारीची गरज होती, पण त्यांच्या खेळाडूंना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. केन विल्यमसन (30), टॉम लॅथम (28) आणि टॉम ब्लंडेल (30) यांनी निराशा केली. रचिन रवींद्र एका टोकाला टिकून राहिला आणि तो 92 धावा करून बाद झाला, पण त्याची ही खेळी संघासाठी पुरेशी नव्हती. त्याने टॉम ब्लंडेलसोबत 56 धावा जोडल्या, पण तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. रचिनने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून प्रबथ जयसूर्याने सर्वाधिक 5 आणि रमेश मेंडिसने 3 बळी घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर धनंजय डी सिल्वा आणि असिथा फर्नांडोने प्रत्येकी 1 बळी घेतला.
Prabath Jayasuriya’s five-wicket haul scripts a memorable Sri Lanka win over New Zealand 👏
🇱🇰 go up 1-0 in the series 🔥#WTC25 | #SLvNZ 📝: https://t.co/PHqmvlAFRP pic.twitter.com/xGbPuc7B7l
— ICC (@ICC) September 23, 2024
पूर्ण कसोटीबदल बोलयाचे झाले तर, सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्या डावात 305 धावा केल्या होत्या. संघाकडून कामिंदू मेंडिसने सर्वाधिक 114 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी पहिल्या डावात वेगवान गोलंदाज विल्यम ओरूर्कने 55 धावांत 5 बळी घेतले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात 340 धावा केल्या आणि 35 धावांची आघाडी घेतली. यादरम्यान संघातर्फे टॉम लॅथमने 70, डॅरिल मिशेलने 57 आणि केन विल्यमसनने 55 धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रबथ जयसूर्याने सर्वाधिक 4 आणि रमेश मेंडिसने 3 बळी घेतले.
त्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात सर्वबाद 309 धावा केल्या आणि न्यूझीलंडला 275 धावांचे लक्ष्य दिले. श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्नेने सर्वाधिक 83 धावा केल्या. त्याच्याशिवाय दिनेश चंडिमलने 61 धावांची आणि अँजेलो मॅथ्यूजने 50 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात किवी संघ 211 धावांवरच आटोपला आणि श्रीलंकेनं विजयावर शिक्कामोर्तब केलं.
प्रबथने 9 घेतल्या विकेट….
श्रीलंकेचा प्रबथ जयसूर्या हा मॅच विनर ठरला. त्याने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने विल्यमसन, ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र आणि विल्यम ओ’रुर्के यांना बाद केले. 30.4 षटकांच्या गोलंदाजीमध्ये प्रबथने 7 मेडन्स ओव्हर्स टाकल्या आणि 68 धावांत पाच गडी बाद केले.
विल्यमसनने टेलरला टाकले मागे…
सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विल्यमसनने रॉस टेलरला मागे टाकले आहे. विल्यमसनने श्रीलंकेविरूध्दच्या कसोटीत पहिल्या डावात 55 आणि दुसऱ्या डावात 30 अशा एकूण 85 धावा करताना आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 359 सामन्यांच्या 525 डावांमध्ये 18,213 धावांपर्यंत मजल मारली आहे. दरम्यान, त्याने 45 शतके आणि 98 अर्धशतके केली आहेत. टेलरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 450 सामन्यांत 18,199 धावा केल्या होत्या. त्याने आपल्या कारकिर्दीत 40 शतके आणि 93 अर्धशतके झळकावली होती.





