पुणे | जात वैधतासाठी सहा महिने मुदतवाढ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यास विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्ग (एसईबीसी) प्रवर्गाप्रमाणेच आता इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबत महाविद्यालयांमध्येही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
त्याशिवाय संबंधित संवर्गाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार नाही. मात्र, सध्या प्रमाणपत्र मिळण्यास संबंधित कार्यालयातून विलंब होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गातून प्रवेश दिला जातो अथवा प्रवेश रद्द होण्याची शक्यता असते.
यावरून विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रमाणपत्र सादर करण्यास सवलत मिळावी, अशी मागणी होत होती. यापूर्वी जुलै महिन्यात एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली.
त्यानंतर आता ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.
दरम्यान, हे प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या कालावधीत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे; अन्यथा अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील व त्यास संबंधित विद्यार्थी स्वत: जबाबदार राहतील, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.





