Six Kings Slam 2024 : उपांत्य फेरीत अल्काराझकडून नदालला पराभव धक्का…

Six Kings Slam 2024 (Rafael Nadal vs Carlos Alcaraz) : सिक्स किंग्ज स्लॅम प्रदर्शनी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत राफेल नदालला त्याचा स्पॅनिश सहकारी कार्लोस अल्काराझकडून 6-3, 6-3 असा पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे याच स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या यानिक सिनरने दुसऱ्या उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविचचा 6-2, 6-7 (0), 6-4 असा पराभव केला.
आता शनिवारी(19 आॅक्टोबर) तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत नदालचा सामना जोकोविचशी होईल तर अंतिम फेरीत सिन्नरचा सामना अल्काराजशी होईल.
Carlos gets the W over Rafa and he’ll face Sinner in the #SixKingsSlam final on Saturday 🙏 pic.twitter.com/dNZYTaigff
— Tennis TV (@TennisTV) October 17, 2024
पराभव झाला असला तरी डेव्हिस चषकासाठी मी पूर्णपणे तयार असल्याचे यावेळी नदालनं सांगितले, जी त्याच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. दरम्यान, डेव्हिस कप फायनल खेळल्यानंतर नदालने टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. तो म्हणाला “एका महिन्यात मला डेव्हिस कपमध्ये खेळायचे आहे, त्यामुळे प्रत्येक दिवस माझ्यासाठी अधिक चांगले होण्याची आणि माझ्या टेनिस कारकिर्दीच्या या अंतिम स्पर्धेसाठी सज्ज होण्याची संधी आहे. त्यामुळे मी माझ्या तयारीवर समाधानी आहे.”
स्पेनकडून डेव्हिस कप खेळल्यानंतर राफेल नदाल निवृत्त होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नदाल आणि अल्काराज यांनी दुहेरी स्पर्धेत एकत्र भाग घेतला होता. दोघेही डेव्हिस कपसाठी पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात.
सिक्स किंग्ज स्लॅम स्पर्धा आहे तरी काय…?
सिक्स किंग्स स्लॅम ही स्पर्धा टेनिसमधील सौदी अरेबियाचा हा नवा प्रयोग आहे. टेनिस इतिहासातील सर्वात मोठी बक्षीस रक्कम असलेली ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत विजेत्यास बक्षीस म्हणून रक्कम दिली जाते मात्र एटीपी (ATP) रँकिंग गुण दिले जात नाहीत. सिक्स किंग्स स्लॅम प्रदर्शनी स्पर्धांमध्ये टेनिसमधील सहा सर्वात मोठे स्टार्संनी भाग घेतला आहे. यानिक सिन्नर, कार्लोस अल्काराझ, राफेल नदाल, रशियन स्टार डॅनिल मेदवेदेव, नोव्हाक जोकोविच आणि होल्गर रुने यांनी सहभाग घेतला आहे.





