Women’s T20 World Cup 2024 (AUSW vs SAW,Semifinal) : सहा वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 मधून बाहेर पडला आहे. पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने कांगारू संघाचा 8 गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2023 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली होती. मात्र यंदा ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरी गाठता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेने त्यांचा पराभव करत 2023 च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेतला आहे. अनेके बॉश ही सामन्याची मानकरी ठरली.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 134 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 17.2 षटकांत 2 गडी गमावत 135 धावा करत सहज लक्ष्य गाठले. अशाप्रकारे स्पर्धेतील कांगारू संघाचा प्रवास संपला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत चार पैकी चार सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा विजयरथ उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेने रोखला आहे. त्यामुळे सातव्यांदा जेतेपदाचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं आहे.
🇿🇦 Two in a row!
South Africa marches into consecutive T20 World Cup finals 💪#CricketTwitter #T20WorldCup #AUSvSA pic.twitter.com/TEOnCH51br
— Female Cricket (@imfemalecricket) October 17, 2024
साल 2009 मध्ये पहिल्यांदा महिला टी-20 विश्वचषक खेळला गेला होता. या स्पर्धेच्या आतापर्यंत 7 आवृत्त्या झाल्या आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विक्रमी 6 वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाशिवाय वेस्ट इंडिजने एकवेळा ट्रॉफी जिंकली आहे. वेस्ट इंडिजने महिला T20 विश्वचषक 2016 साली जिंकला होता, यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ उपविजेता होता. आता उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कांगारूंचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 विकेट गमावत 134 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने 42 चेंडूत सर्वाधिक 44 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत 2 चौकार मारले. याशिवाय एलिस पेरीने 23 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. तर ताहिला मॅकग्राने 33 चेंडूत 27 धावा केल्या. फॉब लिचफिल्डने 9 चेंडूत 16 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेसाठी अयबोंगा खाकाने 4 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय मेरीजन कॅप आणि नॉनकुलुलेको मलाबा यांना 1-1 असे यश मिळाले.
ऑस्ट्रेलियाच्या 134 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का 25 धावांवर बसला. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर तन्झिम ब्रिट्स 15 चेंडूत 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर लॉरा वोल्वार्ड आणि ॲनेके बॉश यांच्यात 95 धावांची भागीदारी झाली. अनेके बॉशने 48 चेंडूत 74 धावा केल्या. तर लॉरा वोल्वार्डने 37 चेंडूत 42 धावांचे योगदान देत संघांला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत ॲनाबेल सदरलँड हिने 2 गडी बाद केले.