SIR Campaign: पुणेकरांना मोठा धक्का! शहरातील तब्बल १५ लाख मतदारांची नावे वगळली जाणार? वाचा सविस्तर
SIR Campaign: विशेष सखोल पुनरिक्षणानंतर (SIR) पुणे शहरातील ३४.६५ लाख मतदारांपैकी फक्त १९.८० लाख मतदार उरणार; ४२ टक्के नावे वगळली जाण्याची शक्यता.

SIR Campaign – मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणानंतर (एसआयआर) मयत, दुबार, स्थलांतरीत किंवा अनुपस्थित मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीतून वगळली जाणार आहे. संभाव्य आकडेवारीनुसार शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतील एकूण १४ लाख ८५ हजार म्हणजेच ४२ टक्के मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. यातील सर्वाधिक मतदार हडपसर विधानसभा मतदारसंघातील असून तेथील २ लाख ९८ हजार मतदारांची नावे वगळली जातील.
सर्वाधिक कमी म्हणजे ९२ हजार मतदार कसबा मतदारसंघातील वगळले जातील. शहरात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, पर्वती, हडपसर , पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ अले आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. आठ मतदारसंघ मिळून एकूण ३४ लाख ६५ हजार ३०५ मतदार होते. आता एसआयआर मोहिमेनंतरसंभाव्य यादीनुसार १९ लाख ८० हजार २४२ इतके मतदार राहणार आहेत.
एसआयआर मोहिमेत मतदार यादीतील प्रत्येक मतदाराला गणना अर्ज देण्यात आला. या अर्जावर मतदाराचे नाव, ओळखपत्र क्रमाक, पत्ता, मतदार यादीतील अनुक्रमांक , भाग क्रमांक, विधानसभा ,लोकसभा मतदारसंघाचे नाव आणि मतदाराचे छायाचित्र आदी बाबी होत्या. हा अर्ज मतदाराला देऊन मतदाराचे २००२ यादीमधील आई, वडील यांची माहिती भरावयाची होती. तसेच आधारक्रमांक, फोटो घेण्यात आले. हा अर्ज घेऊन त्याची माहिती अपलोड करण्यात आली.
अशी राबवली मोहिम
जे मतदार मयत होते, त्यांची नावे वगळण्यात आली. दुबार मतदारांना एकच ठिकाणी नावे ठेवण्याची संधी देण्यात आली. जे मतदार दिलेल्या पत्यावर आढळून आले नाहीत, अशा मतदारांच्या घरी तीनदा जाऊन सूचना पत्र चिटकविण्यात आले. अशा मतदारांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क करून गणना अर्ज भरून देण्याचे आवाहनही बीएलओंनी केले. अशा प्रकारे एसआयआर मोहिम राबविण्यात आली.
वगळलेले मतदार
संभाव्य मतदार यादीनुसार वडगाव शेरी मतदारसंघातील वगळलेल्या मतदारांची संख्या २ लाख ४ हजार १०२ इतकी आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत वगळण्यात आलेल्या मतदारांची टक्केवारी ३९.३४ टक्के आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वगळलेल्या मतदारांची संख्या १ लाख ३० हजार २३३ इतकी आहे. हे प्रमाण ४४.४७ टक्के इतके आहे. कोथरुड मतदारसंघात वगळलेल्या मतदारांची संख्या २ लाख ७ हजार २७९ इतकी आहे.
हे प्रमाण ४६.२६ टक्के इतके आहे. खडकवासला मतदारसंघातून २ लाख ७८ हजार ४४९ म्हणजेच ४६.६३ टक्के, पर्वती मतदारसंघातील १ लाख ५२ हजार २० म्हणजेच ४०.९५ टक्के, हडपसरमधील २ लाख ९८ हजार ५४६ म्हणजेच ४५.८३ टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील १ लाख २१ हजार ८४६ मतदार म्हणजेच ४०.४६ टक्के आणि कसबा पेठ मतदारसंघातील ९२ हजार ५८५ म्हणज़ेच ३२.५२ टक्के मतदारांची नावे वगळली जाणार आहेत.





