Singapore Open 2024 : ‘त्रिशा-गायत्री’ उपांत्य फेरीत पराभूत, भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात….

Singapore Open 2024 (Badminton) : भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना शनिवारी सिंगापूर बॅडमिंटन ओपन 2024 च्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. यासह भारताचा स्पर्धेतील प्रवास इथेच संपला आहे. याआधी पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि सात्विकसाईराज रँकी रेड्डी-चिराग शेट्टी आपापले सामने गमावून स्पर्धेबाहेर झाले आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया ओपन बीडब्लूएफ (BWF) सुपर 1000 स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 30व्या क्रमांकावर असलेल्या या भारतीय जोडीला 47 मिनिटे चाललेल्या उपांत्य फेरीत जपानच्या चौथ्या क्रमांकाच्या नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदा या जोडीकडून सरळ गेममध्ये 23-21, 21-11 ने पराभव स्वीकारावा लागला.
Treesa-Gayatri’s dream run comes to an end against WR-4 🇯🇵 duo. 🥺
Proud of the sensational show put up by youngsters this week, beating World No. 2️⃣ & 6️⃣ on their way towards this semifinal. Keep up the good work champs. 🙌
📸: @badmintonphoto#SingaporeOpen2024#Badminton pic.twitter.com/gLmPQMrTMW
— BAI Media (@BAI_Media) June 1, 2024
भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये दोन गुणांच्या आघाडीसह सुरुवात केली. मात्र यानंतर त्रिशा-गायत्रीला सामन्यात खूप संघर्ष करावा लागला. जपानच्या जोडीने 16-12 अशी आघाडी घेतली होती. भारतीय जोडीने कडवी झुंज देत स्कोअर 16-16 असा बरोबरीत आणला. यानंतर नमी-चिहारू जोडीने सलग गुण घेत पहिला गेम 23-21 असा जिंकला.
जपानच्या जोडीने दुसऱ्या गेममध्ये आपला वेग कायम राखला आणि सुरूवातीलाच भारतीय जोडीवर 8 गुणांची आघाडी घेतली. यानंतर त्रिशा आणि गायत्री जोडीचे सामन्यात आघाडी घेण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आणि जपानी जोडीने 17-4 अशी मोठी आघाडी घेत दुसरा गेम 21-11 असा सहज जिंकून स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
दरम्यान, बीडब्लूएफ सुपर 750 स्पर्धेत त्रिशा आणि गायत्रीची ही पहिलीच उपांत्य फेरी होती. त्रिशा-गायत्रीने उपांत्यपूर्व फेरीत टोकियो 2020 च्या कांस्यपदक विजेत्या किम सो येओंग आणि काँग ही योंग यांचा पराभव करत आगेकूच केली होती. दुसऱ्या फेरीत, विद्यमान ऑल इंग्लंड चॅम्पियन बेक हा ना आणि कोरिया प्रजासत्ताकच्या ली सो ही यांच्यावर विजय मिळविला होता.





