Nagar | विटनोर कुटुंबाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा

राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्यातील मांजरी येथे राहणाऱ्या ७४ वर्षांच्या सुमनबाई विटनोर यांची निर्घुण हत्या करून मृतदेहाची विटंबना करण्यात आली.आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.
तसेच या घटनेमुळे विटनोर कुटुंब पूर्णपणे भयभीत झाले असून, कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी विटनोर कुटुंब तसेच नातेवाईक आणि राहुरी तालुक्यातील मांजरी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला.
या मूक मोर्चामध्ये बांगडी नको तलवार द्या, नराधमांना फाशी द्या, वाचव गं आई मला वाचव, सावधान राक्षस तुमच्या घराजवळ आहे, आज आमच्या घरात उद्या तुमच्या घरात, अशा आशयाचे फलक हातामध्ये घेऊन मांजरी ग्रामस्थ सहभागी झाले होते.
११ ऑगस्ट रोजी सुमनबाई सावळेराम विटनोर शेतात गेल्याचे सांगून पुन्हा घरी न परतल्या नाहीत. १३ ऑगस्ट रोजी जवळच्या शेतात एक मृतदेह मिळून आला.ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप करण्यात आला होता. तसेच शरीरावर रासायनिक द्रव्य टाकून इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले.
घटनेतील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक देखील केली आणि त्या आरोपीने कबुली देखील दिली आहे. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होऊन जलदगतीने खटला न्यायालयात चालवण्यात यावा.
तसेच विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करण्यात यावी आणि या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी विटनोर कुटुंबाच्या वतीने मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी चोरमोरे यांना देण्यात आले.
या मोर्चामध्ये कैलास विटनोर, रामदास माने, अर्जुन कोऱ्हाळे, आदिनाथ वडीतके, साईनाथ भिसे, सूर्यभान वडीतके, वैष्णवी विटनोर, मोनिका विटनोर, प्रियंका कोऱ्हाळे, गणेश वडीतके, राधाकृष्ण कोऱ्हाळे, विलास विटनोर, भिमाबाई वडितके, तेजस कोराळे यांसह नातेवाईक आणि मांजरी ग्रामस्थ उपस्थित होते.




